मुंबई: राज्यात आजपासून सुरु झालेल्या महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेची बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली. मात्र, नाशिकमधील दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यूने या परिक्षेला गालबोट लागले आहे.
आगासखिंड येथील माध्यमिक शाळेतील दहावीचे शुभम रामदास बरकले आणि दर्शन शांताराम आरोटे हे दोन विद्यार्थी पांढुर्ली येथील जनता विद्यालय येथे आपल्या अॅक्टिव्हा या दुचाकीवरुन जात असताना आगासखिंड येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एच पी गॅसचा टँकरने धडक दिल्यामुळे जागीच मृत पावले. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.
दरम्यान, कोरोनामुळे दोन वर्ष झालेल्या लॉकडाऊननंतर प्रथमच ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होत आहेत. या परीक्षेसाठी १५ लाख ७७ हजार विद्यार्थी बसले आहेत. ५ हजार केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. यंदाची दहावीची परीक्षा १०० टक्के कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डाकडून मोहीम राबवली जात आहे. कॉपीचे गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष खबरदारी प्रत्येक केंद्रावर घेतली गेली आहे. पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थी काहीसे तणावात होते. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी पालकांनीदेखील परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती.
कॉपीमुक्त अभियान कागदावर?
कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण मंडळाकडून पावले उचलली जात असताना दुसरीकडे याच अभियानाचा बोजवारा उडालेला दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा येथील माध्यमिक आश्रम शाळेच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीचा सुळसुळाट पाहायला मिळाला. परीक्षा केंद्राच्या मागच्या बाजूने आणि खिडकीच्या जवळ कॉपी देताना नागरिक मोबाईल कॅमेरात कैद झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.