मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावर राज्यातील वातावरण तापलेले असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचं पाणी करून शिवसेना उभारली. मात्र, या पक्षाची उद्धव ठाकरेंनी माती केली, असे नवनीत राणा म्हणाल्या. त्या एका जाहीर कार्यक्रमादरम्यान बोलत होत्या.
“गर्व माणसाला संपवतो, हे मी फक्त ऐकले होते. पण उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहायला मिळाले. आमच्या बाळासाहेब ठाकरेंनी विचारधारेशी बांधील राहून पक्ष बनवला, वाढवला. त्यांनी रक्ताचं पाणी करत पक्षाला मजबूत केले. एवढे खासदार, आमदार निवडून आले. पण उद्धव ठाकरेंनी पक्षाची माती करण्याचे काम केले”, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
याआधीही शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर नवनीत राणा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात त्यांनी असे म्हटले होते की, “जो रामाचा नाही, हनुमानचा नाही, तो काहीही कामाचा नाही आणि धनुष्यबाणही त्याचा नाही. निवडणूक आयोगाने आज निर्णय दिला असून उद्धव ठाकरे यांना भगवान महाशिवने चांगला प्रसाद दिला आहे”.