नवी दिल्ली : गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग तीन दिवसासाठी पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. सुनावणी सुरू झाल्यानंतर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यात त्यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ‘एकनाथ शिंदे यांच्यावरील अपात्रतेचा निकाल प्रलंबित असताना राज्यपाल कोश्यारींनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ कशी काय दिली?’, असा सवाल ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात उपस्थित केला आहे.
त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयांवर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाकडून युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की, देशाच्या संविधानाचे संरक्षण करणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे. परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये राज्यपाल हे राजकीय घडामोडींमध्ये सक्रीय सहभाग घेत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असतानादेखील त्यांना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ कशी काय दिली?, शिवसेनेत दोन गट पडलेले असतील तर निवडणूक आयोग एका गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह कसे काय देऊ शकते?, असे कायदेशीर प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटाने बंडखोर आमदारांना तातडीने अपात्र करण्याची मागणी केली.
त्याआधी, निवडणूक आयोगाने त्यांना शिवसेनेचे नाव आणि चिन्हही बहाल केले, यावर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात आक्षेप घेण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निर्णयावरील सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. परंतु सुप्रीम कोर्टातील सरन्यायाधीशांनी आज सत्तासंघर्षावरील युक्तिवाद होणार असून उद्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.