- विलास खानोलकर
अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ ह्यांच्या काष्ठ पादुकांची प्राण प्रतिष्ठा तसेच श्री स्वामी समर्थांची तसबीर ह्यांचा स्थापना सोहळा, मंगळवार ३ जुलै २०१२ (गुरुपौर्णिमा) ह्या दिनी वसईतील सुतार आळी येथे मोठ्या थाटात भक्ती भावाने साजरा झाला.
मुंबईतील स्वामी भक्त श्री सच्चिदानंद भगवंतराव दादरकर यांच्या वसईतील वडिलांच्या मिळकतीचे कालांतराने ‘दीपलक्ष्मी गृहसंकुल’ निर्माण झाले. त्यापूर्वी त्यांचे वडील भगवंतराव नारायण दादरकर यांच्या या जागेत असलेल्या औदुंबराच्या छायेत दत्तमंदिर उभारावे अशी तीव्र इच्छा होती; परंतु या जमिनीत गृहसंकुल बांधल्यामुळे तेथे स्वामी समर्थांचा स्वतंत्र मठ बांधता आला नाही. त्यामुळे सच्चिदानंद दादरकरांनी आजूबाजूच्या जागेत मठ बांधण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु त्यांना यश मिळाले नाही, अखेर, त्यांनी आपल्या स्वतःच्या राहत्या जागेत त्यांची आई कै. रतनबाई आणि वडील कै. भगवंतराव ना. दादरकर यांच्या स्मरणार्थ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठाची स्थापना केली. ह्यासाठी गावातील स्थानिक माननीय सुभाष हरि गोरक्ष, सुनील रामनाथ गोरक्ष, प्रफुल्ल पाठारे आणि छाया गिरी, डॉ. गालवणकर, रमेश खानविलकर, सिंधू नेरकर, चेतन देसाई, मनोज मयेकर, डॉ. सामंत इतर स्थानिक मंडळी यांनी भक्तिभावाने सहकार्य दिले. सत्य गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ्यांना श्री सच्चिदानंद दादरकरांच्या वडिलांच्या इच्छेनुसार औदुंबराच्या छायेत स्थानापन्न व्हावयाचे होते. म्हणून हे सर्व स्वामी समर्थांनी घडवून आणले. येथील स्वामी भक्तांची आपल्या गावात श्री स्वामी समर्थांचा मठ असावा अशी खूप इच्छा होती, ती श्री स्वामी समर्थांनी पूर्ण केली. हा अस्मरणीय योग भक्तांच्या मनातून कधीही पुसला जाणार नाही.
वसई येथील या स्वामी समर्थांच्या मठातील मखराची उत्कष्ट काष्ठ सजावट स्वामी भक्त सुनील रामनाथ गोरक्ष यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली झाली. हा मठ वसई स्टेशन (पश्चिम) येथून रिक्षाने १२ -१५ मि. अंतरावर आहे. जवळ तामतलाव आधुनिक सुशोभित केल्यामुळे वातावरण आनंदमय व उत्साही असते. स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, ही विनंती.