कर्जत (वार्ताहर) : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर रात्री ८ च्या सुमारास उद्धव ठाकरे गटाच्या ताब्यात असलेले नेरळ शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय शिंदे समर्थकांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर नेरळ पोलीस ठाण्यात घरफोडी व लुटमारीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नेरळमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे.
शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाविषयी निर्णय दिला. त्यावर एकनाथ शिंदेचाच हक्क असल्याचे जाहीर केले. त्यानंतर राज्यात सर्वत्र शिंदे गटाच्या शिवसैनिक व कार्यकर्त्यांनकडून जल्लोष सुरू असतानाच नेरळ येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रात्री ८ वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटाचे युवासेनेचे तालुका अधिकारी अमर मिसाळ, तालुका सचिव अंकुश दाभणे, उप तालुका प्रमुख अंकुश शेळके, शहर प्रमुख प्रभाकर देशमुख आदीसह परिसरातील अन्य कार्यकर्ते यांनी नेरळ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या मध्यवर्ती कार्यालयालाचे टाळे तोडून कार्यालयात प्रवेश केला.
त्याचा फोटो व्हायरल झाल्यावर ठाकरे गटाचे शिवसैनिक तेथे आले. त्यावेळी तेथे कोणीही नव्हते. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या फोटोंची नासधूस झाल्याचे व शाखेतील तिजोरी गायब झाल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी शिंदे समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.