मुंबई: राज्यातील शासकीय शाळा आता डिजिटल होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि शासकीय शाळांमध्ये आधुनिक पद्धतीने अध्ययन-अध्यापन व्हावे, यासाठी सरकार या मुलांना अद्ययावत टॅबलेट देणार आहे. त्यामुळे पाठ्य पुस्तकांसोबतच विद्यार्थ्यांना आता टॅबवरही अभ्यास करता येणार आहे.
राज्याचा शैक्षणिक स्तर तसेच परफॉर्मिंग ग्रेडिंग इंडेक्स वाढविण्यासाठी राज्यात गेल्या पाच वर्षांपासून ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ अभियान सुरू करण्यात आले असून त्याचेच पुढचे पाऊल म्हणून २०२२-२३ या आर्थिक वर्षात हा ‘स्टार्स प्रकल्प’ सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी २५ कोटी ६२ लाखांची तरतूदही करण्यात आली आहे.
या टॅबसोबत सॉफ्टवेअरचेही दीड हजार शाळांमध्ये वाटप सुरू झाले आहे. या टॅबच्या आधारे ग्रामीण भागातील शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी उभारली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि शासकीय शाळांमध्ये आधुनिक पद्धतीने अध्ययन-अध्यापन व्हावे, यासाठी डिजिटल लायब्ररी महत्त्वाची भूमिका पार पाडेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना भरपूर अवांतर वाचन करण्याची संधी आहे.
इंडस एज्युट्रेन कंपनीद्वारे हे टॅब शाळांपर्यंत पोहोचविले जात आहेत. टॅब प्राप्त करून घेण्यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने जिल्हा परिषद आणि नगरपालिकांना सूचना दिल्या आहेत. सोबतच डिजिटल लायब्ररीसाठी आयसीटी लॅबप्रमाणे वर्गखोली, वीज पुरवठा, फर्निचर आणि इंटरनेट नेटवर्क उपलब्ध करण्याचेही निर्देश दिले आहेत.