गुवाहाटी: श्रद्धा वालकर नंतर निकिता यादव हत्याकांडाचे प्रकरण ताजे असताना आसामच्या गुवाहाटीतही अशा प्रकारची घटना घडली आहे. एका महिलेनं तिचा पती आणि सासूची हत्या करून मृतदेह फ्रिजमध्ये ठेवले. नूनमती परिसरातून तब्बल सहा महिन्यांनी हा प्रकार समोर आला. आरोपी महिलेनं गुन्ह्याची कबुली दिली आहे.
बंदना कलिता असं आरोपीचं नाव असून तिनं पती अमरज्योती डे आणि सासू शंकरी डे यांची निर्घुण हत्या केली. त्यानंतर कलितानं दोघांच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवले. २१ ऑगस्ट २०२२ रोजी हा गुन्हा घडला. त्यानंतर ४ दिवसांनी कलितानं मृतदेहाचे तुकडे बाहेर काढले आणि १७५ किलोमीटर अंतर प्रवास करून मेघालयातील दावकी शहरात मृतदेहाचे तुकडे पॉलिथिनमध्ये टाकून फेकून दिले होते.
पती आणि सासू बेपत्ता झाल्याची तक्रार खुद्द कलितानंच दिली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. काही दिवसांनी अमरज्योती यांच्या चुलत भावानंदेखील पोलीस तक्रार दाखल केली. त्यामुळे पोलिसांना महिलेवर संशय आला.
त्यानंतर पोलिसांना शंकरी डे यांच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. या प्रकरणी गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दिगंता बाराह अधिक माहिती देताना, ‘हत्या जवळपास सहा महिन्यांपूर्वी झाली आहे. आम्ही तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे,’ असं सांगितलं.
या गुन्ह्यात आणखी दोन जणांनी आपली साथ दिल्याचं आरोपी महिलेनं पोलिसांकडे कबूल आहे. कलितानं घराची साफसफाई केल्यानंतर बेडवरील चादर आणि अन्य कपडे घराच्या टेरेसवर जाळले होते. त्यावेळी तिला शेजारच्या महिलेनं पाहिलं होतं. गुन्ह्यात महिलेला साथ देणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.