- दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
जगात असे अनेक राजे होऊन गेले ज्यांनी अनेक राज्ये जिंकली, स्वतःचा राज्याभिषेक केला आणि ते राज्य त्याच्या नावाने ओळखू जाऊ लागलं. मात्र या जगात असा एकच राजा झाला ज्याने राज्याभिषेक केला. पण त्याचं राज्य हे ‘रयतेचं राज्य’ म्हणून ओळखलं गेलं. राजा असूनसुद्धा त्या राजाने लोकशाही रुजविली. ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी तरुणांसाठी आदर्श. त्या दोन तरुण जोडप्यांसाठीसुद्धा ते आहेत. निव्वळ आदर्श न मानता या जोडप्याने राजांनी उभारलेल्या किल्ल्यांचे आरोहण केले. अशाच एका गडावरून उतरत असताना त्या गडाची आठवण कशी उरात साठवून ठेवावी? या विचारातून उदयास आला एक व्यवसाय. ही रंगतदार कथा आहे ‘दी ट्रेकर्स अड्डा’चे संचालक रूपाली आणि अनिकेत या ठाकूर दाम्पत्याची.
रूपाली मूळची कोकणातली. एमबीएची पदवी मिळवलेली. वाणिज्य अभ्यासाची पार्श्वभूमी असलेली. २०२२ मध्ये जाहिरात क्षेत्रातील उमदा तरुण अनिकेतसोबत लग्न होऊन ती ठाकूर कुटुंबाची सून झाली. सासू-सासरे, दीर आणि अनिकेत अशा या चारजणांच्या कुटुंबात रूपालीचा सून म्हणून नव्हे, तर एक मुलगी म्हणून प्रवेश झाला.
रूपाली आणि अनिकेतला एका सूत्रात बांधणारी गोष्ट म्हणजे ट्रेकिंग अर्थात दुर्गम भाग पायी चालणे. आईला (सासूला रूपाली आईच बोलते) आणि नवऱ्याला फिरण्याची आवड, तर रूपालीला पहिल्यापासूनच ट्रेकिंगची आवड होती. रूपालीमुळे त्यांचेदेखील ट्रेक सुरू झाले. आश्चर्य म्हणजे आईने (सासू) पहिला ट्रेक केला तो वयाच्या ५३व्या वर्षी. ज्या कोणाला ट्रेकिंगचा अनुभव आहे त्यांना माहीत आहे की, ट्रेकिंग करताना किती कस लागतो. त्यामुळे अनिकेतच्या आईचं कौतुकच केलं पाहिजे. अनिकेतने जेव्हा ट्रेक सुरू केलं तेव्हा त्याच्या लक्षात आले की, आपण जसे परदेशात जातो किंवा लडाख-हिमाचल-काश्मीरला जातो. तेव्हा तिकडून फ्रिजवर लावायला मॅग्नेट आणतो किंवा तिकडच्या गोष्टी आपल्याकडे आणतो. पण आपल्या गड-किल्ल्यांवर गेल्यावर तिकडची आठवण आपल्याकडे फक्त फोटो स्वरूपात असते, ते पण इन्स्टाग्रामवर टाकण्यासाठी. त्याव्यतिरिक्त दुसरं काहीच नसतं. अनिकेतने जाहिरात क्षेत्रामध्ये १३ वर्षे काम केल्याने त्याच्या डोक्यात त्या ट्रेकनंतर खूप साऱ्या गोष्टींवर सर्जनशील विचार सुरू झाले. या विचारातून-विचारविनिमयातून ‘ट्रेकर्स अड्डा’चा जन्म झाला.
विचाराला कृतीची जोड देणे आवश्यक होते. जवळपास ४-५ महिने त्या संदर्भातील डिझाइनचं काम सुरू होतं. कोणतंही उत्पादन १००% परिपूर्ण असावं, हा अनिकेत आणि रूपालीचा अट्टाहास. त्यामुळे पार दिल्लीपासून ते त्रिपुरा-अहमदाबाद-गुजरात या सगळ्या ठिकाणी प्रवास सुरू झाला. पण शेवटी सगळं महाराष्ट्रातच मिळालं. बहुधा महाराजांची हीच इच्छा असावी. रूपाली आर्थिक विषयाची तज्ज्ञ होती म्हणून तिने आर्थिक बाबी आणि ऑपरेशन्स विभागावर काम सुरू केलं. आई आणि दिराने मॅग्नेट आणि इतर बऱ्याच गोष्टींची जबाबदारी घेतली. अनिकेत क्वालिटी कंट्रोल सांभाळत होता. दिवाळी आधी जसं सगळं कुटुंब फराळाचं काम करण्यात गुंतून जातं, तसंच ठाकूर कुटुंबदेखील ‘ट्रेकिंग अड्डाच्या’ कामात गुंतलं, त्याप्रमाणे टीशर्ट्स – आई, दादा – मॅग्नेट आणि बाबा- सीडबॉल असं काम सुरू झालं आणि बघता बघता ‘दी ट्रेकिंग अड्डा’ हा ब्रँड रूपाली-अनिकेत यांनी आकारास आणला.
कोणताही व्यवसाय सुरू करताना पहिला प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे पैसे आणि वेळ. हे प्रश्न रूपाली-अनिकेत समोरसुद्धा आ वासून उभे राहिले होते. पण ट्रेकिंग अड्डाच्या कल्पनेविषयी या दोघांच्या मनात विश्वास होता आणि या संकल्पनेवर ते दोघेपण ठाम होते. संकल्पनेवरवर ठाम असल्याने मार्ग मिळतं गेला.
दी ट्रेकिंग अड्डामध्ये टी-शर्ट्स, गडकिल्ल्यांचे बॅजेस, स्टिकर्स, सीडबॉल, महाराजांच्या फोटो फ्रेम्स आणि इतर अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराजांच्या गड-किल्ल्यांच्या स्मृती प्रत्येकाला घरी जतन करता याव्यात अशा गोष्टींना शासनाने प्रोत्साहन द्यावे आणि गडकिल्ल्यांची जरा देखभाल करावी, इतकी माफक इच्छा या ठाकूर दाम्पत्याची आहे.
लडाख-काश्मीर-सिंगापूर यांच्या स्मृतीखुणा जशा मिरवल्या जातात. भविष्यात आपण आपले गडकिल्ले आणि सह्याद्रीच्या खुणा त्याच हक्काने मिरवाव्यात, या वाटेने वाटचाल करण्याचा निर्धार रूपाली आणि अनिकेत व्यक्त करतात.
नुकत्याच झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलमध्ये ट्रेकर्स अड्डाने आपलं दालन उभारलं होतं. त्या दालनास अगणित लोकांनी भेट दिली. लोकांचा एवढा भरभरून प्रतिसाद होता की, ट्रेकर्स अड्डाच्या सर्व वस्तू दुसऱ्या दिवशी ‘आऊट ऑफ स्टॉक’ होत्या. रूपाली-अनिकेतसाठी हा क्षण न विसरण्यासारखा होता.
महाराज घडले ते जिजाऊमुळे. जिजाऊ मातेने महाराजांना लढाऊ बाणा, विनम्रपणा, व्यवहारिक शहाणपणाचे धडे दिले. कनवाळूपणासोबत कणखरपणादेखील दिला. जिजाऊ माता खऱ्या अर्थाने सार्वकालिक ‘लेडी बॉस’ आहेत. आपल्या या माऊलीचा आदर्श घेत जिजाऊच्या लेकी निरनिराळ्या क्षेत्रात ‘लेडी बॉस’ म्हणून नावलौकिक मिळवत आहेत. रूपाली ठाकूर अशाच जिजाऊच्या लेकीचा वारसा पुढे नेत आहे. लेडी बॉस म्हणून उद्योगक्षेत्रातील स्वत:चं स्वराज्य निर्माण करत आहे.