- कोकणी बाणा: सतीश पाटणकर
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख तालुक्यात मार्लेश्वर हे गाव आहे. या गावात शंकराचे स्वयंभू असे स्थान आहे. हे मंदिर उंच डोंगरावर गुहेत आहे. असे सांगण्यात येते की, या गुहेत मल्लिकार्जुन आणि मार्लेश्वर अशा दोन शिवपिंडी आहेत. हे दोघे भाऊ आहेत. जेव्हा या मंदिराची स्थापना झाली, त्यावेळी येथे पार्वतीचे स्थान नव्हते. म्हणूनच या देवस्थानची अशी प्रथा आहे की, साखरपा या गावाची गिरिजादेवी आणि मार्लेश्वर यांचा विवाह लावतात.
मकर संक्रातीच्या दिवशी गिरिजादेवी मारळ या गावातून, पालखीतून मार्लेश्वर या गावात जाते. हा लग्न सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातून जास्त प्रमाणात भाविक येतात. या मंदिरात आणि आजूबाजूच्या परिसरात साप असतात. साप कोणालाही ईजा करत नाही. मंदिरात जाण्यासाठी ५०० पायऱ्या आहेत. मंदिराच्या बाजूला डोंगरातून पांढराशुभ्र धबधबा वाहताना दिसतो. श्री क्षेत्र मार्लेश्वर प्रतिकैलास म्हणून ओळखले जाते. ते रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात आहे. ते मारळ गावाचे आराध्य दैवत. त्या तीर्थक्षेत्राला लागून बारमाही अखंड कोसळणारा धबधबा आहे. तो म्हणजे मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा.
देवरुख शहरातून आलेला रस्ता थेट मारळ गावातून मार्लेश्वरापर्यंत जातो. देवस्थानच्या पायथ्याला विस्तीर्ण गाडीतळ आहे. भाविक तेथे गाड्या ठेवून पुढील अंतर चालत जातात. गाडीतळापासून पर्याय सुरू होतात. पायथ्यापासून पाचशेतीस पायऱ्या चढून गेल्यावर मार्लेश्वरच्या गुहेत देवालय आहे. त्या पायऱ्या नागमोडी आकाराच्या भक्कम बांधलेल्या आहेत आणि चांगल्या रुंद आहेत. पायऱ्यांवरून चढताना डोळ्यांत भरतात ती तिन्ही बाजूंनी आकाशात भिडणारी सह्याद्रीची शिखरे. पावसाळ्यात त्या डोंगरांमधून वाहणारे बारीक बारीक धबधबे वेगळाच आनंद देतात.
पायऱ्या चढून देवळाच्या गुहेत पोहोचण्यास साधारण अर्धा तास लागतो. मार्लेश्वर देवस्थान गुहेत विजेची सोय नाही. समस्यांचा आणि पणत्यांचा उजेड असतो. तो मात्र पुरेसा आहे. गुहेचे प्रवेशद्वारही अरुंद आणि कमी उंचीचे आहे. साडेतीन फूट उंच आणि जेमतेम दोन फूट रुंद असे. गुहेचे तोंड म्हणजेच देवळाचे प्रवेशद्वार! त्याला दरवाजा नाही. एका वेळी एकच माणूस, तोही खाली वाकून देवळात जाऊ शकतो. आत गुहा थोडी प्रशस्त आहे. दहा-पंधरा माणसे एका वेळी देवदर्शन घेऊ शकतात. गुहेच्या बाहेर छोटासा झरा आहे. तो झरा तेथे आलेल्या पवनगिरी महाराजांनी १९७३ साली मोकळा केला. पवनगिरी महाराजांनीच मार्लेश्वर देवस्थानची स्वच्छता केली आणि ते ऊर्जितावस्थेस आणले. पवनगिरी महाराज मूळचे सातारा जिल्ह्यातील अतीत गावचे. ते गगनगिरी महाराजांचे शिष्य. ते आधी राजापूर येथे वास्तव्यास होते.
गुरूने आज्ञा दिली आणि ते राजापूरहून थेट आले ते मार्लेश्वर देवस्थानात. ते साल होते १९७३. त्यांनी त्यावेळी घनदाट अशा जंगलमय मूळ देवस्थानाची डागडुजी केली. गुहेत दोन शिवपिंडी आहेत. त्यांपैकी एक मल्लिकार्जुनाची, तर दुसरी मार्लेश्वराची. मल्लिकार्जुन हा मार्लेश्वर यांचा मोठा भाऊ असा समज आहे. गंमत अशी की, मार्लेश्वर यांच्याबद्दलच्या आख्यायिकेत त्यांच्या तीन भावांची नावे वेगळीच येतात. मार्लेश्वर हे शंकराचे देवस्थान. गुहेत कपारींमध्ये साप आहेत. गुहेतील काळोखामुळे ते सहजासहजी दिसत नाहीत, पण ते साप डुरक्या घोणस; या बोआ जातीचे बिनविषारी व म्हणून निरुपद्रवी आहेत. आजपर्यंत कोणालाही त्या सापांनी दंश केलेला नाही. मूळ देवस्थान दयनीय अवस्थेत आहे. आठ फूट बाय पाच फूट अशा चौथऱ्यावर शंकराची पिंडी आणि समोर नंदी असे ते दृश्य आहे.
गुडघ्या एवढ्या उंचीचा कट्टा बाजूने आहे, पण तो ठिकठिकाणी कोसळलेला आहे. चौथऱ्यावर साधा पत्रा आहे. तो गंजून गेल्यामुळे पावसाळ्यात सर्वत्र पाणी गळते. आजूबाजूला जंगल असल्यामुळे तेथे एकट्या-दुकट्याला जाताना भीती वाटते. मार्लेश्वर प्रकट झाले त्या दिवशी, म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वर यांचे लग्न साखरपा गावाच्या गिरजाई देवीशी लावण्याची परंपरा पडली आहे. त्यासाठी संक्रांतीच्या आदल्या म्हणजे भोगीच्या दिवशी गिरजाई देवीची पालखी साखरपा गावाचे मानकरी आणि भाविक खांद्यावरून मार्लेश्वरला घेऊन जातात. तो सोहळा पाहण्यासारखा असतो. पालखी संध्याकाळी गिरजाईच्या देवळातून निघते. ती पालखी भाविक डोंगरवाटेने चालत घेऊन जातात. ते अंतर सोळा किलोमीटर आहे. वाटेत आंगवली या गावात, जेथे मार्लेश्वर यांचे वास्तव्य काही काळ होते, तेथे पालखी मानाने थांबते.
मार्लेश्वराच्या गुहेच्या बाजूने समोर पाहिल्यावर धारेश्वर धबधबा नजरेत भरतो. तो धबधबा सुमारे दोनशे फुटांवरून कोसळतो. धबधब्याला त्या आधी बारा छोटे-मोठे धबधबे येऊन मिळतात. त्यांचा एकत्रित प्रभाव मोठा आहे. धारेश्वर धबधब्याखाली जाण्याची वाट प्रारंभी सोपी पण नंतर मोठमोठ्या खडकांवरून जाते. अनेक आबालवृद्ध धबधब्याजवळ जाऊन येतात. धबधब्याखाली जाणे शक्य होत नाही, कारण तो जलप्रपात दोनशे फूट उंचीवरून कोसळत असतो. तो जेथे पडतो तेथे तयार झालेली घळ खोल आहे. धबधब्याचे पाणी पुढे खळाळत जाते आणि त्याची तयार होते ती बावनदी. ती नदी देवरुख शहराला लागून पुढे रत्नागिरीकडे जाते. मार्लेश्वर देवस्थानासंदर्भात दोन आख्यायिका रूढ आहेत. त्यांतील एक म्हणजे मार्लेश्वर, टिकलेश्वर आणि महाबळेश्वर हे तिघे तपस्वी भाऊ देवरुखजवळील मुरादपूर गावी राहत होते. त्या तिन्ही भावांनी ते गाव जुलमी मुराद राजाच्या अत्याचारांना कंटाळून सोडले. त्यातील टिकलेश्वर पूर्वेला सह्याद्रीच्या टोकावर गेले. महाबळेश्वर शेजारच्या गावात गेले, तर मार्लेश्वर हे थेट आंगवली गावी पोहोचले. तेथे काही वर्षे तपश्चर्या केल्यानंतर ते गावातील गजबजाटाला कंटाळून अंतर्धान पावले. मार्लेश्वर आंगवली गावातून गायब झाल्यामुळे मोठा गहजब उडाला. त्यानंतर आंगवलीतील सरदार अणेराव यांना ते शिकारीला गेले असता मार्लेश्वर यांचे दर्शन सह्याद्रीच्या टोकावर एका गुहेत झाले. त्यांना ज्या दिवशी मार्लेश्वर यांचा शोध लागला तो दिवस होता मकर संक्रांतीचा. त्यामुळे त्या देवस्थानचा वार्षिक उत्सव त्या दिवशी साजरा होतो. मार्लेश्वर नावाच्या उत्पत्तीसंबंधात दुसरी आख्यायिका मारळ गावचे ईश्वर ते मार्लेश्वर इतकी साधी आणि सहज सांगितली जाते.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)