रोज शाळेत दोन दिवसांत जे जे उपक्रम झालेत, त्या सगळ्यांचा अनुभव आता फेब्रुवारीच्या भेटीत विक्रमगडातील शाळेच्या मुलांना पण देऊ या… या कल्पनेवर किशोर सर, प्रल्हाद सर आणि आम्हा सर्व ‘लेट्स इमॅजिन टूगेदर’च्या टीमचे एकमत झाले. या वर्षी नवनवीन संकल्पना आणि उपक्रम या सर्व शाळांमध्ये करायचे हे ठरवलेच होते. मग वर्षाची सुरुवात हसत, खेळत मज्जा-मस्ती करत आनंदाने करायची आणि त्याचबरोबर आरोग्याचे महत्त्वही पटवून द्यायचे, असा संकल्प सोडला.
आमच्या टीममधल्या मानसीची आधीपासूनच खूप इच्छा होती की, आपल्या या छोट्या दोस्त मंडळींना मेजवानीचा लाभ द्यायचा. तिने ते ठरवले आणि तिच्या कुटुंबीयांनी ते अमलातही आणले. त्यांच्या पैरडाइस कॅटरर्सने त्यासाठी बरीच धावपळ केली आणि जय्यत तयारीसुद्धा. तिचा पूर्ण स्टाफ, जेवणासाठी लागणारे सगळे साहित्य आणि खास पिझ्झा बनविण्यासाठीचे साहित्य असा सगळा जामानिमा घेऊन ते कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच टेम्पोने मोज शाळेत दाखल झाले. बरं फक्त जेवणच नाही, तर मुलांच्या मनोरंजनासाठी जादूगारही मुंबईवरून खास आमंत्रित केला होता.
मोज शाळेत मोज, बालिवली, तुसे, वरई, बुद्रुक आणि बिलघर या सर्व शाळेत मुले एकत्रित पहिल्यांदाच जमणार होती. जवळपास ३५० मुले या मौजमजेसाठी एकत्र आली होती. जादूच्या प्रयोगासोबत माईम हा कलाप्रकार ही मुले पहिल्यांदा अनुभवणार होती. मौजमजेचं हे जादुई जग मुलांसाठी नवीन होतं. त्यांचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. शनिवारी हा कार्यक्रम होता, तर आदल्या दोन दिवसांपासूनच मुलं त्या भावविश्वात हरवून गेली होती. जादूगार कसा असतो, तो कसा दिसतो, खरंच जादू असते का? असे अनेक प्रश्न विचारून शिक्षकांना भंडावून सोडले तर होतेच. पण जादूगाराला काय काय प्रश्न विचारायचे याची एक यादीच बनवली होती. काहींनी तर कल्पनेतला जादूगार चित्रात साकारला होता. माईम म्हणजे नक्की काय, ते न बोलता अभिनय करतात म्हणजे काय…? सगळे प्रश्न, उत्सुकता, कुतूहल घेऊन मुलं शनिवारी शाळेत दाखल झाली. त्यांना आणण्यासाठी टेम्पो, टमटम गाड्यांची सोय केली गेली होती. आम्हीही सर्व आमच्या टीमसोबत ९ वाजता शाळेत दाखल झालो.
शाळेत भव्य मंडप बांधला होता. मुंबईत असतो तसाच बुफेच्या काऊंटरचा थाट होता. मुलं उत्सुकतेने वाकून वाकून बघत होती. पिझ्झा कसा बनवतात, ते मानसी आणि तिचे कुटुंबीय या सर्व गोष्टींकडे जातीने लक्ष देत होते. मुलांना हा अनुभव आपण देऊ शकलो याचे समाधान आणि आनंद मानसीच्या चेहऱ्यावर दिसत होता. जादूगाराची एन्ट्री झाली आणि सगळी मुलं नाश्ता करून आपल्या जागेवर पटापट येऊन बसली.
जादूचे प्रयोग आणि माईम हे दोन्ही प्रकार त्यांच्यासाठी नवीनच होते. जादूचे एकेक प्रयोग आणि माईमचा मूक अभिनय मुलांनी फुल्ल-टू एन्जॉय केला. माईम सादर करणारे दोन्ही कलाकार हे वाड्यातीलच होते. या दोन्ही कलाप्रकारांची मुलांना ओळख झाली आणि आपणही हे शिकू शकतो, याची भावना कुठे तरी त्यांच्यामध्ये रुजली. मुलांनी पोटभर हसून घेतल्यावर भरपेट जेवण केले.
सकाळचा पहिला कार्यक्रम होता होता दुपारचे २ वाजले होते. मुलं घरी जायला निघाली आणि आता चित्रकार श्रीनिवास बाळकृष्ण यांच्या बोबडी दृश्यभाषाच्या कार्यशाळेची तयारी सुरू झाली. त्यांच्या या कार्यशाळेतून शिक्षक आणि पालक वर्गही पुन्हा लहान झाले होते, कारण त्यांना मुलांच्या भाषेला समजून देणारी अंकलिपी जाणून घ्यायची होती. त्यात अनेक उदाहरण देऊन चित्रभाषा शिकतानाचा अनुभव आनंद द्विगुणित करून गेला. या आधी डिसेंबरपासूनच श्रीनिवास व प्राची श्रीनिवासने मुलांसाठी चित्रकार्यशाळा आणि मोजमधील भिंत रंगविण्याचे काम सुरू केले होते. मोजमधील मुलांसाठी हा अनुभव खूपच अद्भुत होता. शनिवारचा पूर्ण दिवस एका वेगळ्याच दुनियेत आम्हालाही घेऊन गेला.
रविवार सकाळची सुरुवात डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या आरोग्य मार्गदर्शनाने झाली. डॉ. भाग्यश्री पाटील यांनी मुलांना निरोगी आरोग्याचे महत्त्व सांगताना त्याचबरोबर चांगला स्पर्श-वाईट स्पर्श आणि वयात येतानाच्या समस्या यासारखे नाजूक विषय सहजसोपी उदाहरण देऊन समजावून सांगितले. पौगंडावस्थेतील मुलांना समजून घेणारा कार्यक्रम पहिल्यांदाच या भागात राबवला गेलाय, असे वाडा विभागातील प्रयोगशील शिक्षक प्रल्हाद काठोले आणि किशोर काठोले यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे सहावी ते आठवीतील मुलं आणि मुली एकत्र बसून हा कार्यक्रम ऐकत होते. मुलींसोबत मुलांनाही मुलींच्या समस्या कळणे गरजेचे आहे, असे तेथील शिक्षकांचे म्हणणे होते.
२५ फेब्रुवारी तारीख नक्की करण्यात आली आणि आम्ही पुन्हा सगळे कामाला लागलो. व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुकच्या आमच्या पोस्ट बघून फोन आणि मेसेजेस यायला लागले. “आता परत कधी जाताय, काय मदत हवी आहे, आम्ही पण तुमच्या या उपक्रमात सहभागी होऊ इच्छितो”, वगैरे वगैरे.
मागे वळून पाहता गेल्या ४ वर्षांत (त्यातील दोन वर्षं कोरोनाची होती) आमच्यासोबत बरीच माणसे जोडली गेली. जवळपास ७५ जणांनी आमच्यासोबत प्रत्यक्ष वाडा भेटीत, कार्यशाळेत भाग घेतला. दिवसेंदिवस ही साखळी वाढतच चालली आहे. प्रत्यक्ष येऊन अनुभव घेतल्यावर त्यांना तिथली परिस्थिती अनुभवता आली.
शहराकडून गावातील आपल्या छोट्या मित्रमंडळींसाठी शैक्षणिक सहकार्याचा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाचा सेतू बांधायचं काम ‘लेट्स इमॅजीन टुगेदर’ने हाती घेतलं आहे. जमेल तसं आपल्या परीने आमच्यासोबत जोडले जाणारे सहकार्य करत आहेत आणि हा सेतू बांधायला मदत करत आहेत.
-पूर्णिमा नार्वेकर, दहिसर