राष्ट्रप्रेम, संवेदनशीलता, वास्तवता काय असते हे खराखुरा जातिवंत अभिनेता कधी विसरू शकत नाही. याचे उदाहरण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे होय. ‘दहशतवाद्याची भूमिका साकारणार नाही’ म्हणत नाना पाटेकर यांनी हॉलिवूड स्टारचा चित्रपट नाकारला होता. हॉलिवूड स्टार लियोनार्डो डिकॅप्रियोच्या एका चित्रपटामध्ये काम करण्यास नानांनी नकार दिला होता. ‘दहशतवाद्याची भूमिका साकारणार नाही’ असे ठणकावून सांगत नाना पाटेकरांनी हॉलिवूड स्टारचा चित्रपट नाकारला.
हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियोसोबत काम करण्याचे अनेक कलाकारांचे स्वप्न असतं. सध्या बॉलिवूडमधील कलाकार हॉलिवूडमध्ये जात आहेत. प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट यांसारख्या अभिनेत्रींनी बॉलिवूडबरोबच हॉलिवूडमध्येदेखील विशेष ओळख निर्माण केली. पण बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर यांनी हॉलिवूड स्टार लियोनार्डो डिकॅप्रियोटच्या एका चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला होता. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी एका मुलाखतीमध्ये याबद्दल माहिती दिली.
कश्यपने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘हॉलिवूडचे दिग्दर्शक रिडले स्कॉट यांना त्यांच्या ‘बॉडी ऑफ लाईज’ या चित्रपटात नाना पाटेकर यांना महत्त्वाची भूमिका द्यायची होती; परंतु नानांनी दहशतवाद्याची भूमिका करणार नाही, असे सांगून ही ऑफर नाकारली. जेव्हा अनुराग कश्यपला विचारण्यात आले की त्याने नाना पाटेकरसोबत काम का केले नाही? यावर तो म्हणतो की, दोघांनी अनेकदा एकत्र काम करण्याबाबत चर्चा केली आहे. पण अद्याप योग आला नाही. बॉडी ऑफ लाईज या चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियो आणि रसेल क्रो यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. हा २००८ मध्ये प्रदर्शित झालेला स्पाय थ्रिलर चित्रपट आहे.
-दीपक परब