Tuesday, February 18, 2025
Homeसाप्ताहिककोलाज“जो भी हैं, बस यही एक पल हैं!”

“जो भी हैं, बस यही एक पल हैं!”

आपण सगळ्यांनीच कधी ना कधी अनेक महत्त्वाच्या गोष्टी उद्यावर ढकलून मोठे नुकसान करून घेतलेले असते. अनेकदा माणसाला अनेक गोष्टी खूप उशिरा कळतात. चुका सुधारायच्या कळूनही, राहून जाते आणि मग आयुष्यभराची मनाला कुरतडणारी खंत मनात घेऊन जगणे नशिबी येते. या दुर्दैवी वास्तवावर एका पाकिस्तानी कवींनी अगदी साध्या शब्दात एक सुंदर कविता लिहिली आहे.

पाकिस्तानमधील या लोकप्रिय कवीचा जन्म मुळात आपल्या पंजाबमधील होशियारपूर शहरात ९ एप्रिल १९२३ला झाला होता. त्यांचे नाव होते मुनीर अहमद नियाझी! त्यांचे प्रारंभीचे शिक्षण खानपुरात झाले. फाळणीनंतर पाकिस्तानात गेल्यावर ते तेथील सहिवाल गावात स्थायिक झाले. लाहोरच्या दयाळसिंग कॉलेजातून त्यांनी बी.ए.ची पदवी घेतली. मुनीर यांनी १९४९ साली सहिवाल येथूनच सेव्हन कलर्स नावाचे साप्ताहिक सुरू केले होते. नंतर त्यांनी अनेक वर्तमानपत्रे, रेडिओ आणि टीव्हीसाठी लेखन केले. अगदी साध्या शब्दात पण सर्वांना अपील होतील अशा विषयांवरच्या त्यांच्या कविता खूप लोकप्रिय होत. एकेकाळी त्यांची अनेक गीते पाकिस्तानी सिनेमात इतकी लोकप्रिय झाली की, ६०च्या दशकातले ते पाकिस्तानचे अत्यंत लोकप्रिय सिनेगीतकार ठरले होते.

मुनीर यांच्या कर्तृत्वाची नोंद घेऊन त्यांना पाकिस्तानचे दोन पुरस्कार – ‘प्राईड ऑफ परफॉर्मन्स’ १९९२ला आणि ‘सितारा-ए-इम्तियाझ’ २००५ला पाकच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. २००६ साली २६ डिसेंबरला या मनस्वी कवीचे निधन झाले.

जेव्हा हे मनस्वी कवी सर्वांच्याच अनुभवातील एखाद्या अगदी साध्या विषयावर व्यक्त होतात, तेव्हा त्यात केवढा आशय सामावलेला असतो याचा पुरावाच त्यांची ही कविता आहे. नियाझी यांच्या त्या सुंदर कवितेचे उनवान म्हणजे शीर्षक होते – ‘हमेशा देर कर देता हूं मैं.’ आपल्याकडे जसा मंगेश पाडगावकरांना काव्यवाचनाच्या कार्यक्रमात ‘सलाम’ या कवितेबद्दल आग्रह व्हायचा तसाच आग्रह पाकिस्तानी श्रोते अनेक मुशायऱ्यात नियाझीसाहेबांना त्यांच्या या कवितेसाठी करत असत.
खरे तर आपल्याही बाबतीत ही तशी रोजचीच गोष्ट. आपण अनेक गोष्टी कितीतरी वेळा उद्यावरच नाही का ढकलत? मुनीर यांची ही कविता मात्र वाचकाला गंभीर करून टाकते. त्यांची लेखणी आपल्याला एकंदर जीवनाबद्दल सखोल चिंतन करायला भाग पाडते. कवी म्हणतात, जेव्हा एखादी महत्त्वाची गोष्ट करायची असते, तेव्हा माझ्याकडून नेहमी उशीरच होतो.

हमेशा देर कर देता हूं मैं…
जरुरी बात कहनी हो,
कोई वादा निभाना हो,
उसे आवाज देनी हो,
उसे वापस बुलाना हो,
हमेशा देर कर देता हूं मैं!

जेव्हा तिला दिलेली खात्री, घेतलेली शपथ पूर्ण करायची वेळ आली, तेव्हा मी तिला निराश केले. ती खूप आतून व्यथित होऊन, दुखावून, निघून गेली तेव्हा मी तिला साद घालायला हवी होती. तिला परत बोलवायला हवे होते, पण माझ्याकडून ते झाले नाही.

अनेकदा सर्वांचेच असे होते! कधी कुणाला आपणच मदत करणे गरजेचे असते कारण त्या व्यक्तीला आपणच जवळचे वाटत असतो. तिला आपल्याकडूनच अपेक्षा असते. मरणांतिक अडचणीत ती आपल्याला हाक मारत असते! अनेकदा तर तिला काहीच नको असते. फक्त थोडा दिलासा आणि चार प्रेमाच्या आश्वासक शब्दांची गरज असते. तेवढे शब्दही माणसाला उभारी देऊ शकतात. आयुष्याशी एकट्याने झुंज देत असलेल्या त्या व्यक्तीला धैर्य मिळते. प्रत्येक जण त्याची लढाई स्वत:च लढत असतो. पण कुणीतरी फक्त धीर देऊन ‘लढ’ म्हणण्याची गरज असते. पण तेवढे तरी आपण करतो का?

मदद करनी हो उसकी,
यारकी, ढाडस बढाना हो,
बहुत देरीना रास्तोंपर,
किसीसे मिलने जाना हो,
हमेशा देर कर देता हूं मैं…

अनेकदा आपल्याला चार पावले चालून कुणाच्या तरी पाठीवरून पाठिंब्याचा हात फिरवणेही जीवावर येते? दोघात पडलेले अंतर कापून, पुढे जाऊन भेटण्याचा मनाचा मोठेपणा दाखवणे जमत नाही! आणि मग… बातमी येते ती थेट ‘ती व्यक्ती’ गेल्याचीच! आता पुन्हा कधीही भेट होणार नसते! कितीही प्रामाणिकपणे वाटले तरी पश्चाताप व्यक्त करण्याची, माफी मागण्याची संधी उरलेली नसते!

‘वक्त’(१९६५) मधील एका गीतात साहीर लुधियानवी यांनी असाच मोठा संदेश दिला आहे. जगणे माणसाच्या हातात असलेल्या आताच्या, फक्त याच क्षणात शक्य असते हे सत्य मोठ्या सुंदर पद्धतीने साहिरने मांडले होते. त्या अजरामर गाण्याचे शब्द होते. ‘आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू, जो भी हैं बस यही एक पल हैं.” जे करायची इच्छा आहे ते आताच केले पाहिजे. मग ते प्रेम असो, की ते व्यक्त न केल्याचा पश्चाताप! मुनीर नियाझीनी थोड्या वेगळ्या पद्धतीने तेच सुचीत केले नाही का?

बदललेल्या परिस्थितीत कवीने कुठेतरी मन लावायचा प्रयत्न केला, पण त्याला तेही शक्य झाले नाही. तो म्हणतो, मी जुन्या आठवणी विसरायचे ठरवले, पण त्यालाही उशीरच झाला. काही लोक हृदयाला खूप प्रिय होते. त्यांच्या स्मृती सतत ताज्या ठेवायच्या होत्या, पण मी तर त्यालाही उशीरच करावा ना!

बदलते मौसमोंकी सैरमें,
दिलको लगाना हो,
किसीको याद रखना हो,
किसीको भूल जाना हो,
हमेशा देर कर देता हूं मैं…

आयुष्यात अनेक प्रसंग एकदाच घडत असतात. त्यांचे महत्त्व सर्वांपेक्षा अधिक असते. एखादे असे सत्य असते की ते कळल्याने दुसऱ्यांच्या आयुष्यातील एखादी मोठी बोच, मोठी वेदना कायमची संपू शकणार असते, एखादी जुनी भरून येणार असते, दु:ख उरात कोंडूनच ती व्यक्ती कसेबसे जगत असते. त्या पिडेतून केवळ खरी गोष्ट काय ते कळल्याने त्याची सुटका होणार असते, पण तेही आपल्याकडून होत नाही.

किसी को मौतसे पहले
किसी गमसे बचाना हो,
हकिकत और थी कुछ,
उसको जा के ये बताना हो,
हमेशा देर कर देता हूं मैं!

मुनीर यांची कविता त्यांच्याच आवाजात ऐकल्यावर मन उदास होते तसे ते अंतर्मुख होते. त्या मन:स्थतीत साहिरचे ‘वक्त’मधील शब्द आठवतात, ते आचरणात आणावेसे वाटतात –

“जो भी हैं, बस यही एक पल हैं!”

-श्रीनिवास बेलसरे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -