Friday, May 9, 2025

महत्वाची बातमीपालघर

बस स्थानकांमध्ये हिरकणी कक्षांची दुरवस्था

बस स्थानकांमध्ये हिरकणी कक्षांची दुरवस्था

वाडा (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातील बस स्थानकांमध्ये हिरकणी कक्ष सध्या गायब झालेले दिसून येत आहेत. तर ज्या ठिकाणी हिरकणी कक्ष असल्याचे दिसून येतात त्यांची दुरवस्था झालेली दिसून येत आहे.


दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हिरकणी कक्ष निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची सर्वत्रच चांगली अंमलबजावणी झाली. ही सुविधा चार ते पाच वर्षे सुस्थितीत सुरू राहिली. त्यानंतर अनेक ठिकाणी पंखा, खिडक्यांना पडदे, तर काही ठिकाणी मातांना बसण्यासाठी खुर्चीच्या सुविधा हळूहळू गायब होत गेल्या. अलीकडेच हे कक्षच गायब झाले. डहाणू येथे असलेला हिरकणी कक्ष बस स्थानकात नसल्याने तो शोधून काढणे मातांसाठी कठीण जात आहे.


जव्हार बस स्थानकात हिरकणी कक्ष आहे मात्र या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. बोईसर बस स्थानकात आजवर हिरकणी कक्ष उभारला गेलेला नाही. या ठिकाणी बस स्थानकाची पक्की इमारत नसल्याने हिरकणी कक्ष ठेवला गेलेला नसल्याचे समजते. वाडा बस स्थानकातील हिरकणी कक्ष गायब होऊन चार वर्षे झाली आहेत. जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बस स्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. या ठिकाणी हिरकणी कक्षाची नितांत आवश्यकता आहे. मात्र बस स्थानकात जागा अपुरी असल्याने हिरकणी कक्ष कुठे करायचा, हा प्रश्न येथील प्रशासनाला पडला आहे.

Comments
Add Comment