पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या मेट्रोचे सारथ्य तृप्ती शेटेने केले होते. कारगीलच्या रणभूमीवर आपल्या जायबंदी झालेल्या सैनिकांना हेलिकॉप्टरमधून सुखरूप आणणारी गुंजन सक्सेना होती. अंतराळातून पृथ्वीवर येताना जिच्या देहाच्या ठिकऱ्या उडाल्या ती भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला होती. नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनी वायुदलाचे संचलन करणाऱ्या प्रमुख या महिलाच होत्या. या सगळ्याजणींचं सोशल मीडियावर आपण आता कौतुक करतो. तिला मात्र एका महिलेला स्कूटी चालवायला शिकवते म्हणून पोलिसांना बोलावलं जातं. दम दिला जातो. मात्र ती मागे हटत नाही. स्वत:ला सिद्ध करत स्वत:ची दुचाकी प्रशिक्षण संस्था सुरू करत ७ तरुणींना रोजगारदेखील देते. ही गोष्ट आहे ‘वुमन ऑन व्हील्स (वॉव)’च्या अमृता मानेची.
अमृताचं बालपण दादर-परळ परिसरामध्ये गेलं. लोअर परळच्या होली क्रॉस शाळेत तिचं शालेय शिक्षण झालं. डॉक्टर व्हावं अशी तिची इच्छा होती, त्यासाठी रूपारेल महविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश देखील घेतला; परंतु काही मार्क्सनी तिचा मेडिकल प्रवेश हुकला. मग रसायन विषयात बी.एससीचा अभ्यास सुरू केला. याच काळात ‘उडान’ या कॉलेज फेस्टिव्हलमध्ये तिने स्वतः डिझाइन केलेल्या वस्तूंचा स्टॉल लावला. तिच्या वडिलांचे भाजीविक्रीचे दुकान आहे, त्यामुळे वस्तूविक्रीचं बाळकडू तिला लहानपणीच मिळालं होतं. ‘बोलतो त्याची माती विकली जाते न बोलणाऱ्याचे गहू पण कोणी विकत घेत नाही’ या उक्तीचा वापर करून स्टॉलवरील सर्व वस्तू तिने दोनच तासांत विकल्या. त्या फेस्टिव्हलमध्ये सर्वात जास्त बिझनेस करणारा स्टॉल हे बक्षीस अमृताने पटकावले.
शेवटच्या वर्गात शिकत असताना अमृताकडे तिच्या शेजारी राहणारी रश्मी आली. रश्मीचे तिच्या नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण झाले होते. कारण होते मुलीला शाळेत सोडणे, बस वेळेवर नाही, टॅक्सी यायला तयार नाही अन् पायी जायचं तर अंतर दूरवर होतं. ‘प्लीज, तू मला स्कूटी चालवायला शिकव”, रश्मीच्या आर्जवानंतर अमृता स्कूटी शिकवायला तयार झाली. तसं रश्मीच्या नवऱ्याने पण प्रयत्न केलेला शिकवण्याचा. पण ती तोल जाऊन पडली अन् नवरा ओरडला म्हणून तिने नाद सोडून दिला होता. मात्र अमृताने अवघ्या सहा दिवसांत तिला स्कूटी चालवायला शिकवली. रश्मी आता मुलीला शाळेत सोडायला स्कूटीवरून जाते. आई-बाबांना भेटायला जाते आणि गंमत म्हणजे नवऱ्याला डबलसीटदेखील बसवते.
अमृताची टीवायची परीक्षा उत्तमरित्या पार पडली. वेलिंगकर कॉलेजमध्ये एमबीए करायचं तिने ठरवलं, पण कॉलेज सुरू व्हायला अजून अवकाश होता. रश्मीला स्कूटी चालवायला शिकविल्यानंतर काही ओळखीतील महिलांनी, आम्हालाही तूच शिकव, अशी अमृताला गळ घातली. तेव्हा अमृताने आलेल्या संधीचा सदुपयोग करायचे ठरवले. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर एक पोस्ट टाकली, त्या पोस्टला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला, नावनोंदणी सुरू झाली. दोन दिवसांनी येणाऱ्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर २०१८ साली ‘वुमन ऑन व्हील्स’ या महिला बाईक ट्रेनिंग स्कूलला सुरुवात झाली.
असंच एकदा एका महिलेला शिकवत असताना एका काकांनी पोलिसांना फोन करून सांगितले की, एक मुलगी स्कूटर चालवायला शिकवतेय. अपघात होण्य़ाची शक्यता आहे. पोलीस लगेच येतात. अमृताला पोलीस ठाण्य़ात घेऊन जातात. परत तक्रार येता कामा नये, असं पोलीस बजावून अमृताला सोडून देतात. ‘आपण जे काम करतो ते गुन्हेगारी स्वरूपाचं आहे का?, आपल्यासारख्या चांगल्या घरातील मुलीने पोलीस ठाण्य़ाची पायरी चढणं चांगलं आहे का?, आपण मुलगी असून इतर महिलांना स्कूटी चालवायला शिकवतो हे त्या काकांच्या पुरुषी अहंकाराला सहन झालं नसेल का?, असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात घोंघावत होते. ‘महिलांना गाडी चालवता येत नाही’ हा समज आपण खोटा ठरवायचा, असं तिने मनाशी पक्कं करत प्रशिक्षण देण्याचं काम सुरूच ठेवलं. यात दुसरी गंमत अशी की, त्या तक्रारदार काकांनीच अमृताला फोन करून त्यांच्या सुनेला स्कूटी शिकवण्य़ाची विनंती केली.
आज अनेक मुली, हाऊसवाइफ ते सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर अशा अनेकींना बुलेट चालवायला अमृता मानेची ‘वुमन ऑन व्हील्स’ शिकवते. हा व्यवसाय सुरू केल्यावर प्रशिक्षण कुठे द्यायचे? हा महत्त्वाचा प्रश्न होता. खेळांच्या मैदानात एक वेळ सायकल चालवायला परवानगी मिळेल; परंतु बाइकला तिथे मज्जाव असतो. नवख्या ड्रायव्हरला शिकवताना रस्ता निर्मनुष्य हवा, तिथं गाड्यांची रहदारी नको. पण मुंबईत असा रस्ता मिळणं कठीण आहे. मग त्यातल्या त्यात कमी रहदारी असलेली गल्ली निवडली. तिथेही काही स्थानिक रहिवाशांनी विरोध केला. खरं तर गाडी शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या अडचणींचा सामना करावा लागलेला असतो. पण जे काही शिकवाल ते आमच्या गल्लीत नको, असाच सगळ्यांचा पवित्रा असतो. मग यातून मार्ग काढत, कुणालाही त्रास न देता, आम्ही आमचं काम काळजीपूर्वक सुरू ठेवलं. त्यामुळे एखादा अपवाद वगळता स्थानिकांचा विरोध मावळला.
मध्यमवयीन स्त्रियांना गाडीचा बॅलन्स करायला शिकवणं हे सर्वात प्रमुख काम असतं. बहुतांश बायकांनी सायकलही चालवलेली नसते किंवा ती चालवून अनेक वर्षे लोटलेली असतात. अशा वेळी दोन्ही पाय जमिनीवर टेकवत हळूहळू एक्सिलेटर देणे ही त्यांची स्कूटी शिकण्याची पहिली पायरी असते. सायकल येत असेल, तर स्कूटी बॅलन्स करणं सोपं जातं. सराव झाल्यावर स्कूटी मुख्य रस्त्यावर ट्रॅफिकमधे चालवताना, मागील सीटवर बसून माझे त्या स्त्रीला धीर देणे, तिचा कॉन्फिडन्स वाढवणे हे सुरू असतं. तसेच बाइकवरून कुणी बाजूने कट मारून गेल्यावर काय करायचं, गाडीसमोर अचानक कुणी येऊन थांबलं की ब्रेक कसा मारायचा? हेही आम्ही शिकवतो.
बाइक आणि बुलेट शिकवताना बॅलन्स आणि गिअर यांचा सुवर्णमध्य कसा साधायचा, ट्रॅफिकमध्ये गाडी बंद पडू न देता कशी सुरू ठेवायची, जड गाडी फार जोर न लावता टेक्निक वापरून मेन स्टँडवर कशी उभी करायची याचं लाइव्ह प्रॅक्टिकल नॉलेज आम्ही देत असतो.
अवघ्या दोनच वर्षांत सात महिला ट्रेनर, पाच स्कूटी, एक बाईक आणि एक रॉयल एनफिल्ड वॉव परिवाराचा भाग झाले. “आम्ही शिकवत असलेल्या चांगल्या प्रशिक्षण तंत्रामुळे ट्रेनिंग स्कूलचा नावलौकिक वाढू लागला. ‘माऊथ टू माऊथ पब्लिसिटी’मुळे अनेक ठिकाणाहून फ्रंचायझीसाठी फोन येऊ लागले होते. कोरोना काळात सगळ ठप्प झालेलं. मुलींना पगार देणं शक्य नव्हतं. अशा वेळी होम डिलिव्हरी आशेचा किरण घेऊन आली. वॉव डिलिव्हरीजच्या माध्यमातून किराणा मालापासून ते औषधापर्यंत सारं काही घरपोच सेवेतून लोकांना देता आलं.
वेलिंगकरमध्ये एमबीए करताना अभ्यासासाठी अमृताने तिच्याच व्यवसायाची केस स्टडी घेतली. “या धंद्यातील चढ-उतार, नफा-तोटा याविषयी शिक्षकांसोबत चर्चा करताना अनेक मुद्दे समोर येत गेले. यातूनच आपला ब्रँड मोठा करणं, नावीन्यपूर्ण इव्हेंट करून आपलं काम सतत चर्चेत ठेवणं, या मार्केटिंगच्या अनेक बाबी लक्षात आल्या. त्यातूनच आठ मार्च २०१९ या जागतिक महिला दिनी वॉवने वुमन्स रॅली काढली. पहिल्याच प्रयत्नात ३०० महिला आम्हाला सपोर्ट करायला आल्या होत्या. रस्त्यावर गाडी शिकवत असताना मुंबई पोलिसांनी कधी आम्हाला त्रास दिला नाही. उलट कोणी त्रास दिला, तर आम्हाला सांगा, असं बोलून ते पाठिंबा देतात. आज अनेक महिला पोलिसांना पण बाइक चालवता येत नाही, असं मला काही पोलिसांशी बोलून कळलं. शासनाकडून काही प्रस्ताव आला, तर आम्ही पुढाकार घ्यायला तयार आहोत. गाडी चालवायला शिकताना आणि शिकवताना काय अडचणी येतात, त्यातून मार्ग कसा काढावा? याबाबतीत आम्ही आता एक्स्पर्ट झालो आहोत. यापुढे वुमन ऑन व्हील्स या ब्रँडच्या यशाची गुरुकिल्ली फक्त मुंबईतच न वापरता, फ्रँचायझी मॉडेलद्वारे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात नेण्याचा आमचा विचार आहे,” असे अमृता सांगते.
स्वत:वर विश्वास ठेवणं आणि आपल्यासोबत इतरांना देखील मोठ्ठं करणं ज्याला जमतं तिच ‘लेडी बॉस’ ठरते. अमृताची ही व्याख्या तिला खऱ्या अर्थाने ‘लेडी बॉस’ बनवते.
-अर्चना सोंडे