एके दिवशी पार्थ राणीच्या बागेत गेला. आनंदाने गाणे गात अगदी मजेत. पार्थला जंगली प्राणी फार आवडायचे. वाघ, सिंह, गेंडे, हत्ती अन् हरणेसुद्धा! जणू ते सारे पार्थशी बोलायचे. तो तासन् तास पिंजऱ्यासमोर उभा राहायचा. त्यांच्याकडे एकटक बघत बसायचा. आज बुधवारचा दिवस होता. बागेत फारशी गर्दी नव्हती. तिकीट काढून पार्थ बागेत शिरला. तसा गार वारा अंगाला लागला. जुनीपुरानी झाडं पिवळी पान खाली टाकत होती. जणू पार्थचं स्वागतच करीत होती. समोरचं त्याला माकडांचा पिंजरा दिसला. त्या छोट्याशा पिंजऱ्यात सोळा-सतरा माकडं येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आशाळभूत नजरेने बघत होती. काही मुलं माकडांना चिडवत होती. माकडांकडे बघून नाक खाचवत होतं, तर कुणी त्यांना खडे फेकून मारीत होतं. माकडं ख्यॅ ख्यॅ करीत धावून यायची. तेव्हा लोक फिदीफिदी हसायचे. पार्थला ते दृश्य बघवले नाही. तो तिकडून निघणार तोच त्याला मागून आवाज आला. ‘अरे पार्थ जरा थांबशील का, दोन शब्द माझ्याशी बोलशील का!’ पार्थला कळेना कोण बोलतंय. त्याने मागे वळून पाहिलं, तर पलीकडच्या पिंजऱ्यात पट्टेरी वाघ उभा होता. अन् तोच बोलत होता. पार्थ जवळ गेला. तोच वाघ पुन्हा बोलू लागला. ‘इथं केव्हापासून कोंडून ठेवलंय आम्हाला.’ वाघाचं माणसासारखं बोलाणं ऐकून पार्थ तर उडालाच! आणि मनातून थोडा घाबरलाच. पण क्षणभरच. मग पार्थ म्हणाला, ‘बोल वाघा काय सांगायचंय तुला!’
वाघ म्हणाला, ‘इथं डांबून ठेवलंय आम्हाला. तिकडे जंगलात घरदार आहे माझं! माझी मुलं बाळं आणि मित्रदेखील! गेली पाच वर्षं आहे मी पिंजऱ्यात. एवढ्याशा जागेत जीव गुदमरतोय माझा. लहान मुलं दिसली की, थोडासा हसतोय. तुम्हा माणसांची मुलं किती गोड अन् छान दिसतात नाही. आम्हाला बघून टाळ्या वाजवतात, किती गोड हसतात. मोठ्या माणसांची मला मात्र भीती वाटते. मागे एकदा मला बंदूक मारून बेशुद्ध केले होते आणि मग मला थेट इथेच आणले. आता ठेवलंय मला लोखंडी पिंजऱ्यात. आता मेल्याशिवाय माझी सुटका नाही. इथं माझं सारं जीवनच हरवलंय.’ बोलता बोलता वाघाच्या डोळ्यांत पाणी आलं. पार्थलादेखील वाईट वाटलं.
वाघ पुढे बोलू लागला, ‘बागेत दिवसभर गर्दी असते. तेव्हा आम्हाला जराही विश्रांती नसते. झोपलो असेल, तर लोक दगड मारून उठवतात. हसतात, मोठ्याने टाळ्या वाजवून माणसांचं खाणं आम्हाला खायला घालतात. जणू काही आम्हाला भिकारीच समजतात. जंगलात येऊन वाजवाल टाळ्या, हसाल फिदीफिदी आम्हाला बघून. म्हणून सांगतो बाळा, आम्हा जंगली प्राण्यांचा छळ टाळा. आम्हाला जगू द्या, आमच्या मुलाबाळांत जरा रमू द्या. स्वातंत्र्य फक्त काय माणसांनाच हवे असते काय. तुमच्या राज्यघटनेत आम्हाला काहीच स्थान नाही का? की तुमचं ते स्वातंत्र्य, समता, बंधुता ही केवळ बोलायचीच गोष्ट आहे का!’ असं म्हणून वाघ आपल्या छोट्याशा गुहेत शिरला!
वाघाचं बोलणं पार्थच्या अगदी हृदयाला भिडलं होतं. आता मात्र त्याचं मन बागेत रमेना. पुढच्या पिंजऱ्यातले प्राणी बघवेनात. ती निराश केविलवाणी हरणे, ती चि, चि करणारी माकडे जणू आपल्यालाच काहीतरी सांगत आहेत, असे असं त्याला वाटू लागलं. साखळदंड ओढत पाय हलवणारे हत्ती, कमी पाण्यात राहणारी मगर. जणू प्रत्येक प्राणी पार्थशी बोलत होता, अशा वेळी पार्थ निराश होऊन चालत होता. खरेच या जंगली प्राण्यांना स्वाभिमानाने, मुक्तपणे जगण्याचा अधिकार नाही काय? मी त्यांच्यासाठी काय करू शकतो, असे नाना विचार पार्थच्या डोक्यात घोळू लागले.
पार्थ एकाएकी थांबला आणि घराकडे परत निघाला. घरी येताच आई म्हणाली, ‘काय रे पार्थ, लगेच परत का आलास, काय झाले?’
मग पार्थने आईला सारे काही सांगितले. पिंजऱ्यातल्या प्राण्यांचे हाल बघून आपण त्यांना परत जंगलात सोडायला हवे, तरच ते मजेत जगतील. असं पार्थला वाटू लागलं. यावर आपण काही तरी केलं पाहिजे, लोकांमध्ये जागृती निर्माण करून सरकारपर्यंत आपला आवाज, या जंगली प्राण्यांच्या कथा व्यथा पोहोचवण्यासाठी प्रयत्न आपल्या करायला हवेत, असे त्याला अगदी मनापासून वाटू लागले. याबाबत आपल्याला किती यश मिळेल, याची त्याला चिंता नव्हती. कारण प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीवर त्याची ठाम श्रद्धा होती.
-रमेश तांबे