Friday, July 19, 2024
Homeरविवार विशेष‘परीक्षा पे चर्चा’ने आयुष्याचा पेपर सोपा केला

‘परीक्षा पे चर्चा’ने आयुष्याचा पेपर सोपा केला

आज सगळं जग बदललं आहे. समाजातील, निसर्गातील, वातावरणतील प्रत्येक घटक परिवर्तनाच्या दिशेने चालत आहे. कुठे ना कुठे काहीतरी बदल घडताना दिसत आहेत. जरी बदल होणे हीच गोष्ट कायम असली तरीही यातील बहुतांश बदल हे मानवाला, मानवतेला समूळ नष्ट करणारे आहेत. त्यातील एक म्हणजे बदलातील सामाजिक व्यवस्था. अनेक उतरड्यांची, अनेक दृश्य-अदृश्य पदर आपल्या सामाजिक व्यवस्थेला आहेत. मात्र ही व्यवस्था विस्कळीत झाली आहे. ‘बदलता काळ’ असं कारण देऊन समाजाची, सामाजिक व्यवस्थेची बसवलेली ही घडी विस्कळीत झाली आहे. आणि सर्वात मोठा दृश्य-अदृश्य परिणाम झाला आहे तो कुटुंब व्यवस्थेवर! मी आणि माझंच कुटुंब इतकाच विचार करणारा माणूस त्याही पलीकडे जग आहे हे विसरला आहे. हातात पैसा आल्याने आपल्या भोवतीचं वातावरण हेच विश्व समजू लागला आहे, मोबाइलमध्ये बँकेपासून अगदी दारापर्यंत खाणे मागवण्याची व्यवस्था झाल्याने मला कुणीच नको ही भावना वाढीस लागली आहे. पण यात तो एकटा पडू लागला आहे, हे तो विसरलाय. यातच ‘हेच असतं आयुष्य’ असं समजत शाळा, मग क्लास, टॉपर होण्यासाठी सततची स्पर्धा, फास्ट फूड, एकुलता एक असल्याने जवळचा झालेला मोबाइल आणि त्यातून अडकवत नेणारे मायाजाल असा सगळ्यात नवी पिढी गुरफटत चालली आहे. जे करतोय ते बरोबर की चूक हे सांगायला त्यांच्या आजूबाजूला कोणीच राहिलेले नाही. त्यामुळे या नव्या पिढीची परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे.

पण अशा वेळी ये देशाचे प्रमुख म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या सुखाची जबाबदारी आपल्यावर आहे, असं समजणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे येऊ घातलेलं किंवा आलेलं संकट अचूक ओळखलं आहे. युवा पिढी भरकटत असल्याची चाहूल त्याना लागली आहे. ही पिढी रॅट रेसमध्ये अडकली आहे. त्यांना मार्गदर्शनापेक्षा त्यांच्या पाठीवरून हात फिरवण्याची, मी आहे सांगण्याची गरज असल्याचे पंतप्रधानानी अचूक ओळखले आहे. म्हणूनच तर ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान मुलांना पेपर कसे सोडवायचे हे सांगत नाहीत, तर केवळ शाळेच्याच नव्हे, तर आयुष्याच्या परीक्षेला जाताना कसे सामोरे जाल? याची शिकवण देशभरातील विद्यार्थ्यांना देत आहेत. चर्चा परीक्षेची असली तरीही पंतप्रधान देत असलेले कानमंत्र भरकटणाऱ्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत.

शुक्रवारी ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम देशभरात झाला. देशाच्या विविध भागांतील विद्यार्थी यात सहभागी झाले होते. देश आणि देशाबाहेर अनेक आव्हाने कठोरपणे उभी असताना त्याचा समर्थ सामना करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आपला अत्यंत बहुमूल्य वेळ द्यावासा वाटला, हीच गोष्ट प्रत्येक पालकाला विचारात पाडणारी आहे. त्यात या कार्यक्रमात पंतप्रधानांनी भाषण न देता विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शॉर्टकट, कॉपीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. कठोर मेहनत, वेळेचं नियोजन आणि जो विषय कठीण वाटतो त्याच्या मागे हात धुवून लागणे ही यशाची त्रिसूत्री मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिली. काही लोक हार्डवर्क करतात. काही लोक हार्डली हार्डवर्क करतात. काहीजण स्मार्टली हार्डवर्क करतात, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जे विद्यार्थी मेहनत करतात त्यांच्या आयुष्यात बदल होतोच, असंही ते म्हणाले. तुम्ही मेहनत करा. परीक्षा येतात आणि जातात. आपल्याला आयुष्य जगायचं आहे. आपल्या शॉर्टकटमध्ये जायचं नाही. असं सांगताना पंतप्रधानानी काम केलं नाही, तर थकवा जाणवतो. काम केल्याने आनंद वाटला पाहिजे, असं विद्यार्थ्यांना पटवून दिले, तर टाइम मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे. कठीण विषयावर लक्ष द्या, असं सांगतानाच पेन, पेन्सिल घेऊन एक डायरी लिहा. तुमचा वेळ कुठे वाया गेला ते पाहा.

तुमच्या आवडत्या गोष्टीत तुमचा सर्वाधिक वेळ जातो, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. वाचण्याने माइंड फ्रेश होतो. त्यामुळे तुम्हाला जो विषय आवडत नाही. तो विषय आधी वाचायला घ्या, असंही त्यांनी सांगितलं. एखाद्या कुटुंबप्रमुखांप्रमाणे, घरातील ज्येष्ठाप्रमाणे पंतप्रधानानी केलेले हे मार्गदर्शन बहुमोलाचे आहे. पंतप्रधानांची ही भूमिका आणि त्यामागचा हेतू नीट जाणून घेऊन घरातल्या प्रत्येक मोठ्या व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, हेसुद्धा महत्त्वाचे आहे.

आज लहान मुलांबाबत गुन्ह्याच्या अनेक गोष्टी होत आहेत. याला विस्कळीत समाज कारणीभूत आहे, तो एकसंध व्हावा यासाठी पंतप्रधान विशेष पावले उचलत आहेत. त्याचं अनुकरण केलं तरी खूप मोठा सकारात्मक परिणाम समाजावर होताना दिसणार आहे.

-अनघा निकम मगदूम

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -