
भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी शहरात २६ डिसेंबर रोजी कामतघर परिसरातून अपहरण झालेल्या दीड वर्षीय चिमुरड्याचा शोध लावण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. दीड महिन्यानंतर चिमुरडा आई वडिलांच्या समोर आल्याने आईवडिलांना आनंदाश्रू अनावर झाले. विक्री करण्यासाठी चिमुरड्याची चोरी करणाऱ्या एका व्यक्तीसह दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक तपास करीत संशयित गणेश नरसय्या मेमुल्ला याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने मूलचोरी करून विक्री केल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलीस पथकाने पद्मानगर नवजीवन कॉलनी या परिसरात राहणाऱ्या भारती सुशील शाहू व आशा संतोष शाहू या दोघींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चिमुरड्याची सुखरूप सुटका केली. या तिघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.