
आमदार नितेश राणे यांची मागणी
नागपूर (विशेष प्रतिनिधी) : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम करताना तेथील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांवर कोणाचा दबाव होता, याची माहिती तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले.
सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात एटोप्सी करणारी व्यक्ती रूप शाह यांना पोलीस संरक्षण देण्यात आल्याबद्दल माध्यमांनी विचारले असता नितेश राणे म्हणाले की, तसे असेल तर त्याचे स्वागतच आहे. कारण तुम्ही घटनाक्रम बघितला पाहिजे. जिलेटिनच्या प्रकरणांमध्ये असलेला मनसुख हिरेन याला मारण्यात आले. का मारले, कोणी मारले, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे.
सुशांत सिंगचीपण हत्त्या झाली. कारण त्याच्याकडे दिशा सालियन मृत्यू प्रकरणाबद्दलची काही माहिती होती. रूप शाह यांनी स्पष्टच म्हटले आहे की सुशांत सिंगची आत्महत्त्या नसून ती हत्त्या आहे. त्याचा मृतदेह जेव्हा पोस्टमार्टमसाठी आणला गेला तेव्हा त्याचे हातपाय पहिल्यापासूनच तोडले गेल्याचे दिसून आले. आता रूप शाह, हा कोणासाठी काम करतो? सरकारचे... तेव्हा सरकार कोणाचे होते? उद्धव ठाकरेंचे मग माहिती त्यांनी नको द्यायला, असा सवाल राणे यांनी केला. या सर्व तपासामुळे वरूण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार का असे विचारले असता ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना या सरकारमधील एक तरुण मंत्री वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये कसा जायचा, अवेळी डिनोच्या घरी कसा जायचा? तेरा तारखेच्या रात्री सुशांत सिंगच्या घरी कोण गेले होते? जॉगर्स पार्कमधल्या रहिवाशांनी पाहिलेले आहे. म्हणून आता हे सगळे पळत आहेत. बॉम्ब, लवंगीचे फुसके बार फोडत आहेत. त्यांनी अडीच वर्षांत जे पेरले ते उगवणारच. हे सर्व पुरावे पोलिसांकडे जाणार. रूप शाह यांच्या जबाबामुळे सीबीआयला बळ आले आहे. सुशांत सिंगच्या प्रकरणाची सीबीआय अजून चौकशी करत आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्पष्ट होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग मुख्यालयात जाऊन डॉ. हेडगेवार यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि यावर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचाही राणे यांनी समाचार घेतला. स्वतःला शिवसैनिक म्हणवतो. या माणसाला माहित आहे का, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि रा. स्व. संघाचे नाते किती अतूट होते ते... ज्या संघाच्या कार्यालयातून हिंदुत्वाचा प्रसार होतो, राष्ट्र घडवण्याचे काम होते. त्याबद्दल असे बोलताना यांना काही कसे वाटत नाही? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले काम करत आहेत. यांना अडीच वर्षे जे जमले नाही ते त्यांनी सहा महिन्यांत करून दाखवले आणि राऊतांबद्दल बोलायचे तर जे आपल्या धर्माचे होऊ शकले नाहीत, त्यांच्याबद्दल काय बोलणार, असा सवालही त्यांनी केला. त्यांना वेड्याच्या रुग्णालयात पाठवला पाहिजे. तुरुंगात राहून आल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असेही ते म्हणाले.