नागपूर (विशेष प्रतिनिधी) : वेड्यांचा पक्षप्रमुख वेडाच असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ठाकरे गट म्हणजे दोस्ताना भाग ३ असल्याचेही ते पुढे म्हणाले. ज्यांनी आपल्या विचाराला तिलांजली देऊन हिंदुत्वाशी गद्दारी केली ते आज मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत असेही ते पुढे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली त्यावर संजय राऊतांनी टीका केली त्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले कि आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य हे दिशादर्शक असून ते देशप्रेमाचे एक आदर्शवत उदाहरण आहे आणि खोटा हिंदुत्वाचा बुरखा पांघरलेली संजय राऊत यांच्यासारखी ढोंगी माणसे यावर टीका करत आहेत यापेक्षा कोणतेही दुर्दैव नसून, संजय राऊत यांचा वरचा भाग सटकलेला असून आपल्या नागपूर येथे अथवा राज्यात वेड्याचं रुग्णालय असेल त्यांना तेथे भरती केले पाहिजे व ३१ डिसेम्बरची पार्टी त्यांनी तेथेच साजरी केली पाहिजे असेही नितेश राणे म्हणाले.
मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालय काल शिंदे गटाकडून घेण्याचा प्रयत्न झाला त्यावर बोलताना नितेश राणे म्हणे कि ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा कार्यालय आहे. व शिंदे गटाचा तो अधिकारच आहे ते घेतलाच पाहिजे , जे जे बाळासाहेब ठाकरे यांचे आहे ते ते शिंदेंचं आहे. उद्धव ठाकरे यांचा गट हा आता वाटीएवढा शिल्लक राहिला असून त्यांनी आता याचा हट्ट सोडला पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले लोक कार्यालयात गेले होते त्यांना अटक करण्याची मागणीही नितेश राणे यांनी यावेळी केली.
उद्धव ठाकरे बॉम्बची भाषा कोणत्या आधारावर करत आहेत, त्यांच्या मनगटात कोणतीही ताकत राहिली नसून ते फक्त पँटीतले बॉम्ब आहेत, त्यांना महत्व देऊ नका त्यांना जुलाबाच्या गोळ्या द्यायला हव्यात असे सांगत नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यूची सखोल चौकशी करण्याच्या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला .