सिक्कीम : उत्तर सिक्कीममधील झेमा येथे लष्कराच्या ट्रकला झालेल्या अपघातात लष्करातील १६ जवानांना प्राण गमवावे लागले असून चार जण जखमी झाले आहेत. वळण घेत असताना वाहन उतारावरून घसरून दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याचे समजते.
आज सकाळी लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन जात होत्या. हा ताफा चाटणहून थांगूच्या दिशेने निघाला होता. गेमा येथे जात असताना वळणावर तीव्र उतार असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि वाहन खाली दरीत कोसळले. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. ४ जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दरीतून बाहेर काढण्यात यश आले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या तीन कनिष्ठ अधिकारी आणि १३ सैनिकांसह एकूण १६ जवानांचा मृत्यू झाला. या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ट्विट करुन म्हटले आहे.
https://twitter.com/rajnathsingh/status/1606227236515991553
उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांना वीरमरण आले, हे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले आहे. त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश त्यांचा मनापासून कृतज्ञ राहील. शोकग्रस्त कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहे. जे जवान जखमी झाले आहेत त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना करतो, अशा आशयाचे ट्वीट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.