Friday, April 25, 2025
Homeसाप्ताहिककोलाजMarriage traditions : लग्न परंपरा-संस्कृतीवहनाचे द्योतक

Marriage traditions : लग्न परंपरा-संस्कृतीवहनाचे द्योतक

सामाजिक प्रतिष्ठा, भूमिका या आज सर्वमान्य झालेल्या संकल्पनांचा उद्गाता असलेला अमेरिकन सांस्कृतिक मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ लिंटन राल्फच्या मते ‘संस्कृती म्हणजे सामाजिक आनुवंशिकता होय.’ पाश्चात्त्य मानवशास्त्रज्ञ एडवर्ड टायलर, लोई, फ्रँट्स बोअस आदी संस्कृतीची व्याख्या, बाजू वेगवेगळ्या प्रकारे मांडतात. पैकी राल्फचे मत संस्कृतीचे वहन कशाप्रकारे होते, यावर भर देणारे तर फ्रँट्सने ‘माणसामाणसातील संबंध, कुटुंब यांतील संबंधांचा विचार’ संस्कृतीच्या कक्षेत एक बाजू विषद करणारे आहे. भारतीय समाजातील विवाहसंस्था हा संस्कृतीचा एक घटक आहे. त्यादृष्टीने कोकणातल्या, सिंधुदुर्गातल्या लग्न परंपरेचा (Marriage traditions) विचार करणे ओघाने येते. लग्नसंस्कृती कुटुंबव्यवस्थेचा पाया म्हटले जाते. विवाह दोन व्यक्तींचा होत असला तरीही त्यायोगे दोन घराणी त्यांच्या कौटुंबिक व्याप्तीसह जोडली जात असतात. पर्यायाने लग्न हा विषय वैयक्तिक न राहता सामाजिक होतो आणि सामाजिक म्हटलं की, त्याला चौकट, मर्यादा, नियम, कायदे लागू होतात. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, त्यानुसार मूळ लग्न परंपरेच्या स्वरूपाचेही परिवर्तन झाले आहे. परिवर्तन समाजांतर्गत होणाऱ्या विकासातून तर कधी क्रिया प्रतिक्रियांतून होणाऱ्या बदलांमुळे घडून येत असते. संस्कृती परिणत होत असताना नव्यातील योग्य गोष्टींचा स्वीकार करते तशीच ती मूळ स्वरूपाच्या खुणाही टिकवून ठेवत असते. कोकणातल्या लग्न परंपरांमध्येही याचे प्रतिबिंब दिसून येते.

कोकणात पूर्वापार वधू-वरांची निवड घरातली वडीलधारी माणसं करत आलेली आहेत. सग्यासोयऱ्यांकडून दोन्हीकडील संपूर्ण माहिती, त्यापूर्वी कोणत्या घराण्यांशी लग्नसंबंध जोडले गेले आहेत वा होते, मुला-मुलीची पार्श्वभूमी यांची खातरजमा केली जाते. माहितीच्या आधारावर स्थळ सुचवणे वा होकार, नकार देणे ठरवले जाते. एकदा होकार मिळाल्यानंतर प्रतिष्ठितांसमोर मुलीकडे होणाऱ्या ‘डाळीबैठकी’त लग्नासंबंधी ठराव होतात. पूर्वी बांबूच्या डाळ चटईवर (डाळप शब्द आठवत असेलच) बसून ही ठरावाची बोलणी होत असत. म्हणून त्याला “डाळीबैठक” म्हटलं जातं. लग्नाआधी नारळफोडणी म्हणजेच साखरपुडा केला जातो. त्यावेळी देवासमोर गाऱ्हाणं घालण्याची रीत आहे. हाती घेतलेल्या शुभकार्याला कुलदेवता, ग्रामदेवतेच्या आशीर्वादाचं मागणं या गाऱ्हाण्यातून मागितलं जातं. पूर्वी साखरपुड्याप्रसंगी मुलाचे वडील भावी कुलवधूला समाजातील प्रतिष्ठितांच्या साक्षीने कुंकुम लावत. दोन घराण्यांची सोयरिक – सोर्गत होई. साखरपुड्याच्या पूर्वीच्या रितीमध्ये बदल होऊन सिंधुदुर्गातल्या मराठा समाजात सासऱ्याऐवजी नवऱ्या मुलाचा भाऊ होणाऱ्या वहिनीच्या हाती अंगठी घालण्याची पद्धत रूढ झालेली दिसून येते. वधूने वराला थेट लग्नातच अंगठी घालण्याची रीत इथे आहे. लग्नाचे निमंत्रण प्रथम आपल्या कुलदैवतेला, ग्रामदैवतेला देण्याची परंपरा सांभाळली जाते.

“घाणा जि घातिला खंडीभर भाताचा; घाणा भरिला सवाखंडी सुपारी, मांडवी व्यापारी…” अशा लग्नगीतांनी परडी किंवा घाणा भरणीला सुरुवात होते. त्यानंतर हळद लागण्यापूर्वी वधूच्या माहेरच्या खळ्यातल्या मांडवातल्या एका खांबाला सावरीच्या खांबाची मुहूर्तमेढ बांधली जाते. “दारातल्या गे मुहूर्तमेढी, तुझ्यावर भार कैशाचा… मजवर भार कुंकवाचा…” यासारखी लग्नगीतं हे सगळे क्षण बोलके करतात. हळदीनंतर अांघोळीसाठी सावरकांड्याच्या तीन काठ्या जोडून तयार केलेल्या त्रिकोणात काठ्यांना स्पर्शही न करता त्यामध्ये नवरदेवाला, नवरीला बसवले जाते. यालाच “निम सांडणे” म्हणतात.

श्रद्धा-परंपरेचा विचार करताना याच सदरात आपण ‘निमा’ आणि ‘अखुवारी’ या शब्दांशी परिचित झालो होतो. ‘निमा’ म्हणजे कुमारवयीन, ब्रह्मचारी तर ‘अखू’ किंवा ‘आखुवारीण’ म्हणजे कुमारिका. यादृष्टीने “निम सांडणे” याचा अर्थ कौमार्यावस्था संपून या दोघांचेही गृहस्थाश्रमी सहजीवन इथून पुढे सुरू होणार आहे. निम सांडणेचा अर्थ कौमार्याचा, ब्रह्मचर्याचा त्याग करणे वा ते संपणे असा होतो. म्हणूनच वधूला तिचा मामा “निम सांडला का?” असा जेव्हा प्रश्न विचारतो, त्यावर “निम गेला”, असं ती उत्तर देते. हळदीनंतर देवक बसवले जाते. लग्न लागण्यापूर्वी वाटेतच नवऱ्या मुलाकरवी वधूच्या मंगळसूत्र, शालूची पूजा होऊन पाच नारळांसह ते वधूला दिले जाते. ओटीत हे पाच नारळ बांधूनच ती बोहल्यावर चढते. वधू-वरांमागे सुरीवर लिंबू खोचून काहीजण उभे असतात, त्यामागे अरिष्टनिवारणाचा हेतू असतो. वरासोबत असणाऱ्या लहान मुलाला ‘धेडा’ तर वधूसोबत असलेल्या लहान मुलीला ‘धेडी’ म्हटलं जातं. लग्नानंतर सासरी दुसऱ्या दिवशी हळद उतरवणे, अंगठी शोधण्यासारखे खेळ खेळण्यातून नवदांपत्यामधील बुजरेपणा कमी व्हावा, कुटुंबात नववधूला सामावून जाणे सोपे व्हावे, असा उद्देश असतो. पाचपरतावण ही परंपरासुद्धा सासरी दिलेल्या मुलीची ख्यालीखुशाली कळावी, माहेराला कळावी यासाठीच निर्माण झालेली असावी. सिंधुदुर्गात काही घराण्यांमध्ये कुळाचारानुसार लग्नानंतर जागरण – गोंधळ घालण्याचीही परंपरा आहे.

सिंधुदुर्गातल्या मालवण तालुक्यातील कट्टा परिसरातल्या मसणे परब घराण्यातला नवरा मुलगा आधी स्मशानात जातो आणि नंतर लग्नाच्या मांडवात! स्मशानात जाऊन आधी पूर्वजांच्या स्मरणार्थ पिंडदानाचे विधी केल्यानंतरच शेंडी काढलेल्या नारळात काकड्याची वात पेटवून तिथे वधूसाठीचा मुहूर्तमणी ओवला जातो. आजही या स्थानाकडील मातीची पुरचुंडी आणल्यानंतरच पुढचे लग्नविधी केले जातात. यामागील अखंड सौभाग्यासाठीची आख्यायिका फार पूर्वीपासून इथे सांगितली जाते. कोकणातल्या महादेव कोळी समाजातील विवाह विशिष्ट गोत्रातच होतात. लग्न वडीलधाऱ्यांकडून ठरवले जाते आणि मुलीकडून देज (दहेज – हुंडा) दिला जातो. वधूच्या घरच्या मांडवातच लग्न लागते. या समाजात लग्नाच्या बऱ्याच बारीकसारीक प्रथा असून लग्नामध्ये लग्नगीतं गाणारी धवलारीण नसते.

काही लग्नविधींमध्ये लग्नादिवशी संध्याकाळी नवपरिणित दांपत्याला मांडवाबाहेर येत आकाशामध्ये “अरुंधती वसिष्ठ नक्षत्र” पाहण्यास सांगितलं जातं. या परंपरेचे मूळ दाक्षिणात्य – तमीळ विवाह परंपरेत आढळतं. आकाशात अनेक द्वैती तारे असताना फक्त अरुंधती वसिष्ठ नक्षत्रातले हे दोन तारेच दाखवण्यामागचे कारण म्हणजे हे द्वैती तारे एकमेकांभोवती एकाचवेळी एखाद्या आदर्श जोडप्याप्रमाणे फिरतात. खगोलविज्ञानानुसार अवकाशातील बहुतांश द्वैती ताऱ्यांमध्ये एक तारा स्थिर असतो आणि दुसरा त्याभोवती फिरतो. अरुंधती वसिष्ठ नक्षत्र ताऱ्यांच्या परस्परपूरक गतीचा खगोलीयसंबंध नवपरिणित दांपत्याच्या सहजीवनाशी, लग्नसंस्कारांशी जोडण्याचे हजारो वर्षांपूर्वी पूर्वजांना सुचले असावे. मानववंशशास्त्राच्या दृष्टीने माणसाने समाजाचा सदस्य म्हणून स्वीकारलेले कायदे, धर्म, नीती, संस्कार यांतूनच संस्कृती आकाराला येत असते. लग्नविधींचा विचार करताना प्राचीन काळी होणारे बालविवाह लक्षात घेता वडीलधाऱ्यांनी सुयोग्य वधू-वरांची निवड करणे, त्यांच्यासाठी खेळांचा समावेश करत कौटुंबिक वातावरण निर्माण करत नात्यात सहजता आणणे या गोष्टी विचारपूर्वक झालेल्या दिसतात. घाणा भरण्यातून संपन्नतेचा, हळदीसारख्या कार्यक्रमांतून निरोगी दंपतीजीवन मिळण्याचा, पानवेलीची पाने तसंच आंब्याच्या डहाळे – पानांच्या उपयोगातून मांगल्याचा संस्कार विधींसोबत जोडलेला दिसतो. लग्नसंस्थेमध्ये वंशवृद्धीसाठी स्त्री आणि पुरुष यांवर विवाहाविधींद्वारे वि अधिक वह् म्हणजे विशिष्ट कुळ, समाज, जीवन वाहून नेण्यासाठी करण्यात आलेला सोळा संस्कारांपैकी महत्त्वाचा संस्कार होय. लग्न परंपरा, विधी यांतून संस्कृती वहनामागील विचार, उद्देश यातून स्पष्ट होतात.

– अनुराधा परब, ज्येष्ठ पत्रकार आणि प्राचीन भारतीय संस्कृती अभ्यासक ([email protected])

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -