आमदार नितेश राणे यांनी उडवली खिल्ली
मुंबई : महाविकास आघाडीच्या महामोर्चाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. त्यांच्यासह आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंचीही उपस्थिती होती. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे.
आजचा महाआघाडीचा हल्लाबोल मोर्चाचा उद्देश भावी महिला मुख्यमंत्री लाँच करण्यासाठी होता की महाराष्ट्रहितासाठी होता? दादा, नाना जागे व्हा, महत्वकांक्षा ओळखा, असे ट्विट आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
रश्मी ठाकरे यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील थेट अशी कुठलीही जबाबदारी नाही. मात्र, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यापूर्वीही उबाठा गटाच्या विविध कार्यक्रमांमध्ये मंचावर आवर्जून उपस्थित असतात. मविआच्या मोर्चातही उद्धव ठाकरेंचे संपूर्ण कुटूंब उपस्थित होते. आमदार नितेश राणेंनी यावरुनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे.
आजच्या महाआघाडीच्या हल्लाबोल्ल मोर्चाचा उद्देश भावी महिला मुख्यमंत्री लॅांच करण्यासाठी होता की महाराष्ट्रहितासाठी होता? …दादा, नाना जागे व्हा, महत्वकांक्षा ओळखा @OfficeofUT@MahVikasAghadi
— nitesh rane (@NiteshNRane) December 17, 2022
दरम्यान, या महामोर्चात आदित्य ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटूंबियांच्या बॅनरबाजीची चर्चा सुद्धा रंगली होती. यावेळी एका कार्यकर्त्याने दुचाकी फोटोंनी सजवली होती. यावेळी आदित्य ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा फोटोवरील उल्लेख सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. त्यामुळे हा मोर्चा समाजहितासाठी आहे की राजकीय महत्वकांक्षेसाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.