Sunday, July 6, 2025

पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याचे मोदींबाबत वादग्रस्त विधान

पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याचे मोदींबाबत वादग्रस्त विधान

भाजपचे दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर आंदोलन


नवी दिल्ली : '९/११ चा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेनला आश्रय देणारा देश' या भारताकडून करण्यात आलेल्या विधानाला उत्तर देताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका केली. त्यामुळे वाद निर्माण झाला असून भाजपच्या वतीने दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले.


बिलावल भुट्टो म्हणाले की, 'ओसामा बिन लादेन मेला आहे, हे मी भारताला सांगू इच्छितो, पण गुजरातचा कसाई जिवंत आहे आणि तो भारताचा पंतप्रधान आहे. बिलावल भुट्टो संयुक्त राष्ट्रांच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत. भुट्टो पुढे म्हणाले की, मोदी पंतप्रधान होईपर्यंत त्यांच्यावर अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परराष्ट्रमंत्री आहेत. आरएसएस म्हणजे काय? हिटलरच्या 'एसएस'पासून आरएसएसने प्रेरणा घेतल्याचे वादग्रस्त विधानही बिलावल भुट्टो यांनी केले.


https://twitter.com/ANI/status/1603686951382822913

दरम्यान बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उच्चायुक्तालयासमोर उपस्थित होते.


परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बोलताना काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला फटकारले होते. जयशंकर म्हणाले होते की, ज्या देशाने अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेनला आश्रय दिला आणि शेजराच्या देशाच्या संसदेवर हल्ला केला, त्यांना उपदेश देण्याचा अधिकार नाही. जग पाकिस्तानकडे दहशतवादाचे केंद्र म्हणून पाहते, असंही जयशंकर म्हणाले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा