Sunday, July 6, 2025

Mandaus Cyclone : चेन्नईत ‘मंदौस’ चक्रीवादळाचा हैदोस; महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Mandaus Cyclone : चेन्नईत ‘मंदौस’ चक्रीवादळाचा हैदोस; महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंदोस चक्रीवादळ (Mandaus Cyclone) शनिवारी पहाटे दोन वाजता चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकले. चक्रीवादळाने समुद्र किनाऱ्यावर हैदोस माजवला असून या चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.


‘मंदौस’ चक्रीवादळामुळे चेन्नईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा परिणाम दिसून आला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या पावसामुळे चेन्नईच्या पट्टीपक्कम आणि अरुंबक्कम भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडेही कोसळली. तर काही ठिकाणी घराचे पत्रेही उडाले.


चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूसह तीन राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, तसेच मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये मंदोस चक्रीवादळामुळे ११५ मिमी पाऊस झाला. ८९ जनावरांचा मृत्यू झाला असून १५१ घरांचे नुकसानही झाले.


‘मंदौस’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाने तामिळनाडूची किनारपट्टी ओलांडली असून ते वायव्य दिशेने पुढे जात असल्याने या भागात ५५ ते ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहताना दिसून येत आहेत, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच काही काळाने या वाऱ्यांची गती मंदावणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली. या दरम्यान चक्रीवादळ झालेल्या भागामधील २०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ९००० जणांना अन्न पुरवठाही करण्यात आला. त्याशिवाय चक्रीवादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी १५ हजार झाडांची छाटनी करण्यात आली आहे.
आंद्रप्रदेशमध्येही सतर्कतेचा इशारा


तामिळनाडूप्रमाणेच आंध्रप्रदेशातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या वादळामुळे आंद्रप्रदेशमध्ये मुसळधार पासून होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागातून २०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ९००० जणांना अन्न पुरवलेय. त्याशिवाय चक्रीवादळामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी १५ हजार झाडांची छाटनी करण्यात आली आहे.


महाराष्ट्रात पावसाचा अंदाज


महाराष्ट्रात ११ ते १४ डिसेंबरदरम्यान हवामानात बदल होऊन पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


संपूर्ण महाराष्ट्रात चार दिवस बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा परिणाम नाशिक, खानदेश ओलांडून मध्य प्रदेशमधील बेतूल, बऱ्हाणपूर, देवास, होशंगाबाद, मांडला आणि छत्तीसगडच्या काही भागांपर्यंत जाणवू शकतो. दुसरीकडे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत वाढलेले किमान तापमान आणि ढगाळ वातावरण पुढील ४-५ दिवस तसेच राहील, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा