Friday, July 19, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यभारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई

मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज ज्या संस्थांचा मोठा वाटा आहे, अशा संस्थेत “भारतीय शिक्षण प्रसारक संस्था” मानली जाते. आज या संस्थेच ५८ विद्यामंदिरांचं जाळं संपूर्ण मराठवाड्यात विणलं गेलं असलं तरी त्याची पाळमुळं घट्ट रुजवण्यात नि:स्वार्थ बुद्धीने, स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन काम करणाऱ्या संघ कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे. आजोबांनी लावलेल्या झाडांची फळे, फुले, सावली जशी नातवाला मिळते आणि नातवाबरोबरच पांथस्थांनाही त्याचा लाभ होतो तसेच या संस्थेविषयी म्हणावे लागेल.

१९४०-५०च्या दशकात अंबाजोगाई येथे कम्युनिस्ट विचारसरणीचा जास्त प्रभाव होता. स्वामी रामानंद तीर्थ यांनी सुरू केलेली समाजवादी विचारांची एक शाळा येथे होती. संघाची साधी शाखा ही तिथे लागू शकत नव्हती. त्यावेळी संघकार्य वाढीस लागावे म्हणून यादवराव जोशी यांचा एक कार्यक्रम ठरवण्यात आला. पण कार्यक्रम होऊ द्यायचा नाही, असं या विचारसरणीने ठरवलं होतं. तो कार्यक्रम घेताना आलेल्या अनुभवातून कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की, संघ विचार इथे रुजवायचा असेल, तर आपल्याला विद्यार्थी दशेपासूनच सुरूवात करावी लागेल आणि त्यासाठी राष्ट्रीय विचार आणि संस्कार शिक्षण देणारी शाळा आपल्याला काढावी लागेल आणि म्हणूनच काही संघ कार्यकर्त्ते एकत्र आले आणि त्यांनी दोन खोल्यांच्या जागेत एक वर्ग २८ जून १९५१ ला सुरू केला. त्याचवेळी असं झालं की, यादवराव जोशींच्या कार्यक्रमाला योगेश्वरी विद्यालयातील एक शिक्षक आले होते. योगेश्वरी विद्यालयात त्या काळात दत्तोपंत वैद्य हे शिक्षक होते. ते संघाची शाळा चालवत असत. त्यांनी संघात जाणे बंद करावे असे सांगितले गेले. वैद्य गुरुजींनी सरळ नौकरीचे त्यागपत्र दिले व ते खोलेश्वर शाळेच्या प्रयत्नात सामील झाले. राजाभाऊ चौसाळकर, किसनराव कोदरकर, तुळशीराम धायगुडे, खारकर, दत्तोपंत वैद्य ही प्रारंभ काळातील संस्थापक मंडळी. कऱ्हाडेंच्या वाड्यात एका खोलीत वर्ग सुरू झाला. त्यावेळी केवळ १० विद्यार्थी होते. हळूहळू विद्यार्थी वाढू लागल्यावर १९५६ मध्ये माध्यमिक विद्यालय सुरू झालं. मान्यता नव्हती, अनुदान मिळत नव्हते, पैसा नव्हता, प्रतिष्ठा नव्हती व राजकीय विरोध; परंतु तत्त्वाशी तडजोड नसल्यामुळे अथकपणे काम सुरू होतं.

संघाचे सोलापूरचे प्रचारक सुरेशराव केतकर आणि मोरोपंत पिंगळे यांनी संस्थेच्या कार्यात लक्ष घातले. १९६६ मध्ये अंबाजोगाईच्या खोलेश्वर विद्यालयाबरोबर अजून दोन शाळा माजलगाव, उदगीर इथे सुरू झाल्या. पुढे असं झालं की शासन नवीन शाळांना परवानगी देईना. म्हणून मग महाविद्यालय काढायचं ठरवलं. १९७२ साली महाविद्यालय सुरू झालं आणि १९७५ला आणीबाणी लागली. महाविद्यालयातल्या ०६-०७ प्राध्यापकांना तुरुंगात टाकल गेलं. त्याशिवाय कॉलेजवर प्रशासक नेमला गेला.

आज अंबाजोगाई, लातूर भाग म्हटला की, साहजिकच आपल्याला प्रमोदराव महाजन व गोपीनाथराव मुंडे यांची आठवण होते. त्यांचाही या संस्थेची जवळचा संबंध होता. त्याच दरम्यान भाजपचे वरिष्ठ नेते प्रमोद महाजन यांचे वडील निवर्तले आणि त्यांच्या घरी आर्थिक प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी पत्रकारिता शिकत होते ते सोडून लगेच या संस्थेत शिक्षकाची नोकरी पत्करली; परंतु त्यांनाही आणीबाणीमध्ये तुरुंगवास झाला. त्यानंतर ते राजकारणात गेले, मोठे नेते झाले. त्यानंतरही प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी संस्थेला कायमच सहकार्य दिले. म्हणूनच प्रमोद महाजन यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांच्या नावाने संस्थतील एकाला दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देत असते. आज संस्थेच्या ५८ शाळा व महाविद्यालय आहेत. या शाळांना शाळा न म्हणता संस्कार केंद्र आणि मुख्याध्यापकांना संस्कार केंद्रप्रमुख असे संबोधले जाते. कारण या केवळ शाळा नसून राष्ट्रीय विचार, देशभक्ती आणि संस्कार रुजवणाऱ्या संस्था आहेत असं मानलं जातं.

संस्थेची शिक्षण क्षेत्रात अनेक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहेत. संस्थेने सुरू केलेले अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम नंतर राज्य शासनाने सुद्धा हाती घेतले आहेत. उदाहरणार्थ नेतृत्व गुणविकास, परिपाठ हे विषय संस्थेत खूप आधी १९७२,७३ वर्षापासून शिकवले जात. ते नंतर राज्य शासनाने संपूर्ण राज्यभर लागू केले.

१९७८-७९ हे खरंतर संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष होतं. पण बरेच ज्येष्ठ कार्यकर्ते तुरुंगात असल्यामुळे त्यावर्षी ते साजरं झालं नाही. आणीबाणी उठल्यानंतर रौप्य महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आणि त्याला श्रधेय अटलबिहारी वाजपेयी उपस्थित राहिले होते. अटलजींच्या येण्यामुळे एक वेगळे चैतन्य मराठवाड्यातल्या शिक्षण क्षेत्रात निर्माण झालं. रौप्य महोत्सवाच्या सांगता समारोपाला परमपूजनीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे मार्गदर्शन मिळाले. जो काळाप्रमाणे बदलतो तोच भविष्याशी आपलं नातं टिकवून ठेवू शकतो. त्यामुळे सेमी इंग्रजी, सीबीएससी अशाही गरज असेल तिथे शाळा काढण्यात आल्या. संस्कारक्षम वयातल्या मुलांसाठी विद्याभारतीचा अभ्यासक्रमही राबवला जातो. मामा क्षीरसागर, दामू अण्णा, कुकडे काका अशा सर्वांच्या सहकार्याने इथे प्रशिक्षण शिबिरेही घेतली जात असत. संस्थेतील एका शिक्षकाला राष्ट्रपती पुरस्कार, तर अनेक शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. विद्यार्थ्यांची बौद्धिक ज्ञानाबरोबर शारीरिक तंदुरुस्तीही महत्त्वाची असते. त्यामुळे खेळांकडेही विशेष लक्ष दिलं जात. खो-खो, कबड्डी, व्हॉलिबॉल, मलखांब, दंड, तलवार, जोरबैठका यांचे संघ राज्यस्तरावर दर वर्षी चमक दाखवत असतात. संगणक अभ्यासक्रम, वाचनालय, विज्ञान प्रदर्शन, घोष, पाठांतर स्पर्धा, महापुरुषांच्या जयंत्या तसेच दहावीच्या मुलांसाठी संध्याकाळी विशेष वर्ग चालतात. सर्व सण-उत्सव साजरे केले जातात. धार्मिक सण साजरे करताना त्या मागचा सामाजिक उद्देशही शिकवला जातो. उदाहरणार्थ होलिकोत्सवामध्ये सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना त्यांच्यातील एक अवगुण एका कागदावर लिहून आणायला सांगितला जातो आणि तो कागद या होळीमध्ये दहन करायचा. आपला हा दुर्गुण पुढच्या वर्षात आपण काढून टाकण्याचा प्रयत्न करूया हे मनात बिंबवण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो. संस्थेने सुवर्णमहोत्सव दणक्यात साजरा केला. त्याला स्वतः पूजनीय सरसंघचालक के. सी. सुदर्शन आणि समारोपाला खुद्द नरेंद्रभाई मोदी उपस्थित होते. संस्थेचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च पदावर कार्यरत आहेत.

संस्थेचा माजी विद्यार्थी कृष्णकांत कुलकर्णी याला कारगील युद्धामध्ये वीरमरण आलं होतं. त्याची स्मृती कायम राहावी तसेच इतरही मुलांना लष्करात जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी संस्थेजवळील एका चौकाला कृष्णकांत कुलकर्णी नाव देण्यात आलं आहे. संस्थेमधील एनसीसी युनिटमधील अनेक विद्यार्थ्यांना लष्करामध्ये सेवा देण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. प्रजासत्ताक दिनी राजपथावर पथसंचलन करण्यासाठी संस्थेच्या विद्यार्थ्यांना अनेकदा संधीही मिळाली आहे. दहावीच्या बोर्डाच्या यादीत येणं ही जेव्हा मुंबई-पुण्याकडच्या विद्यार्थ्यांची मक्तेदारी होती तेव्हा एक वर्ष संस्थेचा कासराळीकर हा विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून दहावीत पहिला आला होता. कोरोना काळातही मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळेत ऑनलाइन वर्ग घेतले गेले होते.

कलोपासना, बलोपासना आणि ज्ञानोपासना या सर्वांचा एकत्रित परिणाम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होऊन तो चांगल्या चारित्र्याचा नागरिक व्हावा हे मिशन संस्थेने डोळ्यांपुढे ठेवले असून त्यानुसार विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून शिकविणारा शिक्षक हा या व्यवस्थेचा कणा असला पाहिजे, अशा धारणेतून शिक्षकांचे प्रशिक्षण होते.

भविष्यामध्ये संस्थेचे स्वायत्त विद्यापीठ तयार व्हावे या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. कौशल्य आणि कला विकसनासाठी आस्था नावाचे एक केंद्र नुकतेच लातूर येथे सुरू झाले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळावेत यासाठी अनेक छोटे-मोठे कोर्सेस चालवले जातात. आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी या अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना कार्यानुभवाच्या माध्यमातून सूतकताईचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. व्यवस्थापन महाविद्यालय, विधी महाविद्यालय महिलांसाठी अद्ययावत वसतिगृह, अंबाजोगाई येथे विज्ञान केंद्र उभारणे, पोखरी येथे कौशल्य विकासासाठी कार्यशाळा उभारणी अशा प्रकारचे अनेक भविष्यकालीन उपक्रम संस्थेने हातात घेतले आहेत. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला विद्यार्थ्यांचा त्यांच्या शालेय जीवनातच अधिकधिक स्पर्श व्हावा अशा प्रकारची मनस्थिती नेहमीच संस्थाचालकांची राहिलेली आहे. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात अग्रणी असलेली ही संस्था आपले कार्य आत्मविश्वासाने पूर्ण करत आपलं जाळं अधिक वाढवत आहे.

-शिबानी जोशी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -