Sunday, July 14, 2024

studyroom : ओरखडा

Book is my real friend. मनापासून माझं प्रेम पुस्तकांवर. चुकला पीर कसा मशिदीत सापडतो म्हणतात. तसेच मी कुठे दिसलो नाही की, नक्की माझ्या अभ्यास खोली (studyroom) मध्ये सापडणारच. ‘पुस्तकावरच्या १०० टक्के प्रेमातले थोडे प्रेम इतर ठिकाणी वापरा’. नंदना म्हणजे माझी पत्नी मला म्हणते.

आज घरात सत्यनारायणाची पूजा होती आणि मला सगळे शोधत होते. एवढ्या मोठ्या बंगल्यात, बागेत मी कुठेच नव्हतो. नंदना बरोबर माझ्या वाचन खोलीत आली आणि मी दिसलो. पण मी वाचत नव्हतो. तिला आश्चर्य वाटले. समोर पुस्तक उघडे होते. माझी तंद्री खिडकीबाहेर कुठेतरी एकटक लागली होती. खाली पुस्तकात अंडरलाईन केलेली वाक्ये नंदनाने वाचली.

‘जीवनात काही प्रसंग असे घडतात की, कोऱ्या पाटीवर ओढले गेलेले चरे. पाटी पुसली तरी अक्षरे जातात, नवीन उमटतात, पण चरे राहतातच. आपल्या प्रेमाची कक्षा वाढवा. चरे मिटवायचा प्रयत्न करा.’ किशोर आता काय संबंध याचा! काहीतरी विचार करत बसू नको. गुरुजी पूजेसाठी येत आहेत. ऊठ लवकर, चल. मी परत परत तेच आठवतो. ‘नंदना तुला आठवतं? आपल्याला बाळ नाही. गेल्या वर्षी सहाव्या महिन्यात तुझी नॉर्मल डिलीव्हरी झाली. पण बेबी गेलेली होती. त्यानंतर अलीकडेच तुझी डिलीव्हरी झाली. मुलगा झाला, मी तर हवेतच होतो. सगळीकडे आनंद शिंपडला होता.’ दोन दिवस झाले, बाळाला कावीळ झाली. ‘काळजीचे कारण नाही, असे होते’ हा विश्वास डॉक्टरांनी दिला. बाळ इनक्युवेटरमध्ये होते. दिवसरात्र आपण त्याला पाहत होतो. पण दुर्दैव बाळ गेलं आणि सर्वत्र अंधार झाला’

‘अहो, आता काय या आठवणी काढताय? अजून चांगले योग येऊ शकतात. ‘Be positive’ हे मी तुम्हाला सांगू का? इतके वाचन तुमचे आहे. त्यावरून तुम्हीच सांगता ना. नदीच्या पाण्यात एका ठिकाणी पाऊल टाकलं की, दुसरे पाऊल परत तिथेच टाकता येत नाही. कारण पाऊल उचलेपर्यंत ते पाणी पुढे निघून गेलेले असते. म्हणून हा पाटीवरचा ओरखडा विसरा. माझ्या मनावर यापेक्षा तीव्र ओरखडा आहे.’ ‘तो कसला?’ नंदीनीने कपडे आवरता आवरता विचारले. ‘तुला आठवतं?’ तुझी मावस बहीण आपल्या घरी जेवायला आली होती. तिच्या ९ महिन्यांच्या मुलाला घेऊन. श्रावण शुक्रवार होता. जेवण झाली आणि सरकत सरकत समईकडे तुझा भाचा निघाला आणि मी त्याला पायाने ढकलायचा प्रयत्न केला.

‘मला आठवतंय. मी तुला ओरडले की, लहान मुलाला पायाने ढकलतात का? अरे, निदान आज तरी ते जिवतीचे झाले आहे. पुस्तक प्रेमाची कक्षा इतर ठिकाणी वळव जरा.’

‘आता वाटतंय की, तो ओरखडा खोलवर होता. तुझी बहीण आतून चिडली होती. इकडचे, तिकडचे कारण सांगून ती लगेच घरी गेली. पुढे आपले बाळही गेले.’

‘किशोर, आता ऊठ. पूजेला चल, त्या आठवणी, ते ओरखडे विसर आता. नवीन श्रीगणेशा लिहूया आता.’ मी ओरखड्यांसहीत उठलो आणि पूजेला बसलो. सांग्रसंगीत पूजा झाली. गुरुजी म्हणाले, ‘आता पूजा आटोपली. दोघेही नमस्कार करा. काय ‘मागणं’ मागायचे असेल ते मागून घ्या.’

नंदीनीचे भरलेले डोळे सांगत होते की, तिने मुलाचीच प्रार्थना केली असणार. मी हात जोडणार, इतक्यात मला हायऽऽ हायऽऽ बोलं ऐकू आले. बघतो तर देव्हाऱ्यातील समईजवळ त्याच मावस बहिणींचा आता दुसरा दीड वर्षाचा झालेला मुलगा हात लावायला चालला होता. मनातला ओरखडा चमकला आणि झटदिशी उठून त्याला उचलून कडेवर घेतले. ‘बाप्पाला, जय जय कर,’ म्हणून सांगितले. लगेचच हिची बहीण जवळ आली. माझ्या कडेवरून मुलाला घेतले आणि तिची कृतज्ञतापूर्वक नजर सारं काही बोलून गेली. काही वेळा भावना या भाषेपेक्षा मोठ्या ठरतात. मी माझ्या प्रेमाची कक्षा रुदांवण्याचा प्रयत्न केला होता.

येशू ख्रिस्तांच्या पायात पहिला खिळा ठोकला गेला. तेव्हा तो म्हणाला होता, ‘हे माझ्याचं वाटेला का? पण हळूहळू हाता पायाला खिळे ठोकत ठोकत शेवटी कपाळावर खिळा ठोकताना तो म्हणाला, ‘देवा, यांना माफ कर, प्रेमाची कक्षा येशूत रुंदावली होती आणि माझ्या मनातील पाटीवरचा ओरखडा पूर्णपणे पुसून पुन्हा नवीन श्रीगणेशा लिहायला प्रारंभ केला होता. प्रेमाची कक्षा रुदांवली होती.

-माधवी घारपुरे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -