
कर्जत (वार्ताहर) : नोंदविण्याचे येणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वीस टक्के सायबर गुन्ह्यांची (cyber crime) नोंद होत असते. मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर मुळे हे गुन्हे होत असतात. फेसबुक, इन्स्टाग्राम वापरामुळे आपण सायबर गुन्ह्यांमध्ये अडकत जातो आणि बदनामी टाळण्यासाठी तरुण वर्ग आत्महत्या करण्यास मागेपुढे पहात नाही.
काही वर्षांपूर्वी लॉटरी लागली आहे, असा मेसेज यायचा त्यामुळे पैशाच्या लोभामुळे अनेकांना गंडा घातला गेला. एटीएम कार्ड मुळेसुद्धा फसवणूक होते. अशिक्षित ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक याचे बळी ठरतात. ११२ हा नंबर तत्काळ पोलीस मदतीसाठी आहे. या नंबरवर कॉल केल्यास आपली अडचण थोडक्यात सांगितल्यास अर्ध्या तासाच्या आत पोलीस येतात. मात्र खोटी माहिती सांगू नका.' असा सल्ला कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी येथे केले.
कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय, आयपीए- एमएसबी, आयपीए रायगड स्थानिक शाखा आणि कर्जत तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६१ वा राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाचे आयोजन सेमिनार हॉल मध्ये करण्यात आले होते. समारंभाचे उदघाटन कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. डी. कोल्हे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी डॉ. काळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या चढत्या आलेखाची माहिती सांगितली.
त्यानंतर डॉ. दीपक दळवी यांनी, सीपीआर आणि प्रथमोपचार प्रशिक्षण या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच प्रथमोपचार देण्याची तत्त्वे समजावून सांगितली. गरम वस्तू किंवा अग्नीमुळे होणाऱ्या बर्न्स हाताळण्याच्या तंत्राची चर्चा केली. त्यांनी पीडितेला वाचवण्यासाठी स्टॉप, ड्रॉप आणि रोल पद्धतींचा उल्लेख केला. विजेच्या धक्क्यांवर प्रथमोपचार करण्याबाबतही सविस्तर माहिती दिली.