
डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आज, बुधवारी पहाटे भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवलेत. रिश्टर स्केलवर ३.६ तीव्रतेचे धक्के जाणवल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पालघर जिल्ह्यात आज, बुधवारी पहाटे ४ वाजून ४ मिनिटांनी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. डहाणू, कासा, आंबोली, धानिवरी, उर्से, धुंदलवाडी, घोलवड, तलासरी बोर्डी या परिसरात ३.६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तलासरी भागात मागील ३ वर्षांपासून लहान मोठ्या भूकंपाच्या हादऱ्यांचे सत्र सुरूच असून हे हादरे मागील ७ महिन्यांपासून बंद झाले होते. मात्र, आज पुन्हा एकदा भूकंप जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
सुदैवाने आजपर्यंत या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे मोठी जीवित हानी झाली नसली तरी सतत बसणाऱ्या धक्क्यांमुळे या परिसरातील घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.