न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने तब्बल ५० वर्षांनंतर ‘आर्टेमिस-१’ (Artemis-1) यशस्वीरित्या लाँच केले. नासाचे मिशन मून हे अमेरिकेचे मोठे पाऊल मानले जात आहे.
यापूर्वीही नासाने चंद्रावर जाण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत. या मिशनचा उद्देश चंद्रावरील जीवनाचा शोध घेणे हा आहे. आर्टेमिस-१ मिशनचे फ्लोरिडा येथील स्पेस सेंटरमधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. आता आर्टेमिस-१ चा एक व्हीडिओ नासाने शेअर केला आहे. ज्यामध्ये पृथ्वीचे अप्रतिम दृश्य टिपण्यात आले आहे.
नासाने ‘आर्टेमिस-१’ नावाने आपले ट्विटर हँडल तयार केले आहे. आर्टेमिस नावाच्या या ट्विटर हँडलवरून एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये पृथ्वीची अप्रतिम छायाचित्रे टिपण्यात आली आहेत. हा व्हीडिओ शेअर करताना नासाने लिहिले की, मिशन मूनच्या या यानाने पृथ्वीची ही अद्भूत छायाचित्रे टिपली आहेत.
आर्टेमिस -१ ही मोहीम नासाच्या मंगळ मोहिमेनंतरची सर्वात महत्त्वाची मोहीम आहे. नासा या मिशनच्या माध्यमातून ओरियन अंतराळयान चंद्रावर पाठवत आहे. हे यान ४२ दिवसांत चंद्रावर प्रवास केल्यानंतर परत येईल. अमेरिकेच्या ५० वर्षांपूर्वीच्या अपोलो मिशननंतर प्रथमच अंतराळवीरांना चंद्रावर नेण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.
आर्टेमिस-१ मोहिमेदरम्यान, ओरियन आणि एसएलएस रॉकेट चंद्रावर पोहोचेल आणि ४२ दिवसांत पृथ्वीवर परत येईल. जर हे मिशन यशस्वी झाले तर, २०२५ पर्यंत अंतराळवीर चंद्रावर पाठवले जातील. आर्टेमिस-१ मोहिमेनंतरच नासाचे शास्त्रज्ञ चंद्रावर पोहोचण्यासाठी इतर आवश्यक तंत्रे विकसित करतील. जेणेकरून चंद्राच्या पलीकडे जाऊन मंगळाचा प्रवासही करता येईल.