श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील शोपियानच्या कॅपरिन परिसरात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन जिहादी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. कॅपरिन परिसरात आज, शुक्रवारी सकाळी ठार झालेले हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असून यापैकी एक पाकिस्तानी आहे. दरम्यान या परिसरात आणखी दहशतवादी असल्याची माहिती पुढे आल्यामुळे सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घालत शोध मोहिम हाती घेतली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत आतापर्यंत 2 दहशतवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव कामरान भाई उर्फ हनीस असे असून तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. तो कुलगाम-शोपियन भागात सक्रिय होता. एकाची ओळख पटलेली नाहीये. सध्या इथे शोध मोहीम सुरूच आहे. अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील शोपियानच्या कैपरिन भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी आज सकाळी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.
दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि त्यामुळे शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. आतापर्यंत एक दहशतवादी मारला गेला आहे. यापूर्वी १ नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या चकमकीच्या घटना घडल्या होत्या. या दोन्ही ठिकाणी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत सैन्यासोबतच जम्मू-काश्मीरचे पोलिसही सहभागी झाले होते.