नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीमध्ये तब्बल १४ वर्षांनंतर सर्वाधिक ३३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. २००८ नंतरचे नोव्हेंबरमधील हे सर्वाधिक आणि सरासरीपेक्षा ४ अंशांनी जास्त तापमान आहे. यापूर्वी १ नोव्हेंबर रोजी ३० अंशांवर तापमानाची नोंद झाली होती. क्लायमेट इम्पॅक्ट लॅबच्या अहवालानुसार भारताचे वार्षिक सरासरी तापमान या शतकाच्या अखेरीस ३ अंश सेल्सिअसने वाढू शकते. सध्या देशाचे वार्षिक तापमान २६.३ अंश सेल्सिअस असून ते २९.३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल.
देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढू लागला आहे. ही थंडी कडाक्याच्या थंडीत बदलू शकते. कारण देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामान आणखी बिघडू शकते. या आठवड्याच्या अखेरीस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह हिमवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्याचा परिणाम दिल्लीसह इतर राज्यांमध्ये दिसून येईल.
उत्तर पंजाबमध्येही हलका पाऊस पडू शकतो. मध्य भारत आणि पूर्व भारतातील हवामान कोरडे राहील. दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ईशान्य भारतात विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते.