सुरेश काटे
तलासरी : तलासरी तालुक्यातील वेवजी काटीलपाडा येथे असलेल्या दगडाच्या खदानीत दगड काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या सुरुंग स्फोटाने वेवजी गाव हादरत असून या स्फोटाने गावातील ६९ लोकांच्या घरांना तडे गेले आहेत. तर २५ पाण्याच्या बोरिंगाचे पाणी आटले आहे. याबाबत महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले आहेत. या खदानीत केल्या जाणाऱ्या सुरुंग स्फोटाने गाव हादरत असताना, शासकीय यंत्रणा मात्र कुचकामी कारवाई करीत असल्याने गावकऱ्यांचा जीव टांगनीला लागला आहे.
वेवजी काटीलपाडा येथे खदान असून या खदानीत दगड फोडण्यासाठी सुरुंग लावण्यात येतात. परंतु हे सुरुंग स्फोट करताना मोठ्या प्रमाणात दगड निघण्यासाठी बोअर ड्रिल मारून स्फोट करण्यात येतो. त्यामुळे या सुरुंग स्फोटाने एक ते दोन किलोमीटरच्या परिसरात प्रचंड हादरे बसतात आणि या हादऱ्यांनी वेवजी काटीलपाडा येथील ६९ घरांना तडे जाऊन आदिवासीची ही घरे धोकादायक झाली आहेत. याच बरोबर लोकांच्या पाण्याच्या बोरिंग अाटल्या आहेत. त्याची संख्या २५ वर गेली आहे. काही बोरिंगच्या मोटारी तर आत मध्येच अडकून पडल्या आहेत. आदिवासी बांधवांच्या घरांचे नुकसान होत असताना, मात्र शासकीय यंत्रणा झोपेत असल्याने या खदानीला कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल केला जात आहे.
या खदानीजवळ जिल्हा परिषदेचे शाळा असून या शाळेला देखील मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. त्यामुळे या धोकादायक शाळेत बसून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने या लहान मुलांचा जीव ही टांगनीला लागला आहे. याबाबत आता महसूल विभागाने वेवजी काटीलपाडा येथे जाऊन घरांचे पंचनामे चालू केले आहेत.
गुजरात राज्यात दगडाला मोठी मागणी असल्याने गुजरात हद्दीवर असलेल्या वेवजी येथील खदानीत प्रचंड सुरुंग स्फोट करण्यात येऊन दगड काढण्यात येतात. दुर्देवाची गोष्ट म्हणजे महसूल विभागाकडून घरांचे पंचनामे सुरु असताना सुद्धा खदानीत सुरुंग स्फोट सुरु होते.
वेवजी काटीलपाडा येथील ६९ घरांचे पंचनामे करून जबाब नोंदवला आहे. – लहानू महाला, तलाठी
घरांचे पंचनामे करण्यात येऊन रिपोर्ट तहसील कार्यालयात देण्यात येणार आहे. – नीलेश साळुंखे, मंडळ अधिकारी