सिंधुनगरी (प्रतिनिधी) : हवामानावर आधारित फळ व भातपीक विमा योजनेत विमा कंपन्या शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वेळेत देत नाहीत, हवामान केंद्रांची मोजमापे सदोष आहेत, नुकसानभरपाईचे निकषही शेतकऱ्यांचेच नुकसान करणारे आहेत व शेतकऱ्यांना या विमा कंपन्या दाद देत नाहीत, अशा तक्रारी जिल्हावासीय शेतकऱ्यांनी सिंधुनगरी येथील जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीत आ. नितेश राणे यांच्यासमोर मांडल्या. विमा कंपन्या, कृषी विद्यापीठ, शासनाचे कृषी आयुक्त कार्यालय हवामानाचे मोजमाप घेणारे स्कायमेट या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक १२ डिसेंबरला घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही आ. नितेश राणे यांनी या बैठकीत दिली.
दरम्यान आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी विमा कंपन्या कृषी अधिकारी यांच्यासमवेत आजची ही बैठक होत असल्याचे जाहीर होताच विमा कंपनीकडून देय असलेली शेतकऱ्यांची ६ कोटी ३४ लाख रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम तत्काळ जमा झाली. त्याबद्दल सर्वच शेतकऱ्यांनी या सभेच्या प्रारंभीच आ. नितेश राणे व जिल्हा बँक अध्यक्ष महेश दळवी यांचे उत्स्फूर्तपणे अभिनंदन केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या पुढाकाराने जिल्ह्याच्या इतिहासातील अशी पहिली बैठक शनिवारी झाली. आमदार नितेश राणे, बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी मार्गदर्शन केले. बँकेचे संचालक प्रकाश बोडस, प्रकाश मोर्ये, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा कृषी अधिकारी डी. एस. दिवेकर, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी अरूण नातू, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पराग म्हसले, जिल्हा समन्वयक करिश्मा धनराज, रिलायन्स विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक अधिकारी येडवे या अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१२ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये विमा कंपनीच्या पातळीवरील, आयुक्त पातळीवरील जे प्रश्न असतील, ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू शासन स्तरावरील जे प्रश्न आहेत, ते अधिवेशन काळात मांडूच. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, सर्वसामान्य जनतेचे आहे. जनतेचे सरकार आले आहे. याची जाणीव सर्वसामान्यांना होईल, असे काम आपण करू, अशी ग्वाहीही आ. नितेश राणे यांनी दिली.
विमा कंपन्यांनी आपल्या सोयीचे निकष बनवले असून जिल्ह्यातील उष्णतामान वाऱ्याचा वेग पाऊस वादळ याबाबतचे निकष आंबा पिकासाठी, भात पिकासाठी सोयीचे नाहीत. अशा निकषामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेले हवामान केंद्रे ही स्कायमेट या यंत्रणेकडून हाताळली जातात. तापमान व हवामानाची नोंद घेतली जाते. मात्र ही हवामान केंद्रे चुकीच्या ठिकाणी आणी यासाठी वापरले गेलेल्या यंत्रणेत त्रुटी असल्याने ही यंत्रणाच अद्ययावत करणे गरजेचे आहे. योग्य हवामानाच्या नोंदीच होत नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. एका तालुक्यात हवामान मोजमापाची माहिती दिली जाते. पण अन्य तालुक्यांत शेतकऱ्यांना हवामान मोजमापाची माहिती दिली जात नाही याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. ज्या भागात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन होतो, त्या भागात कमी नुकसानभरपाई, तर ज्या भागांत अल्प आंबा होतो, त्या भागात मोठी नुकसानभरपाई होते. याकडेही काही शेतकऱ्यांनी लक्ष वेधले.
बीड पॅटर्नप्रमाणे सिंधुदुर्ग पॅटर्न हवा : जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी
बीड जिल्ह्याने फळ व पीकविम्याबाबत शासनाकडून बीड पॅटर्न मंजूर करून घेतला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईतील तफावत दूर करण्यासाठी हा बीड पॅटर्न महत्त्वाचा मानला जात आहे. केंद्र सरकार राज्य सरकार व शेतकऱ्यांचा हिस्सा अशा एकूण रक्कमेतून शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो. बीड जिल्ह्याने विमा कंपनीचा मार्जिन मनी राखीव ठेवून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी दिली जाते. हा बीड पॅटर्न या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयीचा असून तो या जिल्ह्यांतही लागू करावा, त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावा, तसेच कोकम सुपारी यासारख्या पिकांचाही समावेश व्हावा. वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीचा ही समावेश व्हावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आ. नितेश राणे यांच्याकडे केली. तसेच जिल्ह्यातील या फळपीक विमा बाबत शेतकऱ्यांसमोर ज्या अडचणी आहेत, त्या अभ्यासपूर्ण मांडल्या.
मुंबई: मुले असो वा वयस्कर...प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आईस्क्रीमचे सेवन सर्वाधिक केले…
मुंबई (खास प्रतिनिधी): भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात आता पेंग्विन…
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…