रत्नागिरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हुशार विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि संशोधक वृत्ती जागृत करण्यासाठी गगन भरारी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. छत्तीस निवडक विद्यार्थ्यांना नासा या अमेरिकन आणि इस्त्रो या भारतीय अंतराळ संस्थाची सैर घडवून आणली जाणार आहे. या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले असून जिल्हा नियोजनामधून तरतूद केलेल्या ६५ लाख निधी वितरणाला शिक्षण संचालकांनी तांत्रिक मंजुरी दिली आहे. याची अंमलबजावणी पुढील वर्षाच्या आरंभी होणार आहे.
गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या शाळांनमधील विद्यार्थी संशोधन प्रकल्प सादर करत आहेत. त्याच्यातील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गगनभरारी उपक्रम राबवण्यासाठी पावले उचलली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती कुमार पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाला पालकमंत्री उदय सामंत यांनीही पाठबळ देत जिल्हा नियोजनामधून नासासाठी ५५ लाख रुपये आणि इस्त्रोसाठी १५ लाख रुपयाची तरतूद केली आहे. या प्रकल्पात अंतराळ अभ्यासात जागतिक स्तरावर काम करत असलेल्या अमेरिकेच्या नासा, तर भारताच्या इस्त्रो संस्थेला भेटी देऊन जिल्हा परिषद मुलांना त्याची प्रत्यक्ष माहिती देण्यात
येणार आहे.
यासाठी जिल्हा परिषदेच्या ५वी आणि ७वीच्या विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. विद्यार्थी निवड प्रक्रिया डिसेंबर महिन्यात राबवली जाणार आहे. यामध्ये केंद्र आणि बीट स्तरावर १०० गुणांची विज्ञान विषयावर आधारित चाचणी परीक्षा घेतली जाईल. प्रत्येक केंद्रातून दहा, बीटस्तरातून प्रत्येकी दहा, पुढे तालुकास्तरावर दहाजणांची निवड करून जिल्हा स्तरावर अंतिम निवडीसाठी पाठवण्यात येतील. यामध्ये तीन विद्यार्थिनीचा समावेश राहील. जिल्हास्तरावर परीक्षा घेऊन प्रत्येक तालुक्यातील ३ प्रमाणे २७ विद्यार्थी निवडले जाणार आहेत. तसेच इस्त्रो भेटीसाठी नऊजणांची यादी बनवली जाईल. त्यात सातवीमधील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ९ जणांचा समावेश असेल.
हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी जिल्हा परिषद अधिकारी यांची अमेरिकन एम्बसीच्या प्रतिनिधीबरोबर प्राथमिक चर्चा झाली आहे. नियोजन कडून मंजूर ६५ लाख निधीला तांत्रिक मंजुरी मिळाली असून लवकरच प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली जाईल. त्यामुळे मार्च २०२३ पूर्वी प्रत्यक्षात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी नासा, इस्त्रोची सैर करणार आहेत.