उन्हाळ्यात उकाड्यानंतर पावसाळ्यात पाऊस आणि विजांचा कडकडाट त्यामुळे लोक अक्षरश: जेरीस आले आहेत. आता तर हिवाळा सुरू झाला आहे. तेव्हा निसर्गरम्य अशा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात येवा आणि गुलाबी थंडी कशी असते त्याचा आनंद लुटा. सन १९९९ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने देशातील पर्यटन जिल्हा म्हणून देशाच्या नकाशावर सुवर्णाक्षराने नाव कोरले गेले आहे. अशी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. प्रत्येकाला आपल्या जिल्ह्याचा अभिमान वाटत असतो. तसा मलासुद्धा माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभिमान वाटतो. कारण आता जरी मी नोकरीनिमित्ताने मुंबई शहरात असलो तरी माझे पदवीपर्यंत शिक्षण जिल्ह्यात झाले आहे. सध्या हिवाळा सुरू झाला असला तरी थंडीचा मोसम अधिक जाणवतो; परंतु शहरामध्ये थंडी कितीही असली तरी प्रदूषित झालेली थंडी अनुभवायला मिळते. मात्र माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्यास प्रदूषण विरहीत थंडी अनुभवायला मिळेल. अशा या निसर्गरम्य कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन बघा आपल्याला गुलाबी थंडीचा आस्वाद लुटता येईल. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावे लागेल.
सध्या थंडीची चाहूल लागत असली तरी दिवसा उकाडा जाणवत आहे. येत्या काही दिवसांत मुंबईकर थंडीने गारठतीलम असे गृहीत धरू. घाटमाथ्यावरील बोचरी थंडी आणि राज्याच्या उपराजधानीतील अतिकडक गारवा जाणवतो. कारण या ठिकाणची थंडी मी स्वत: अनुभवली आहे. त्याहीपेक्षा कोकणातील थंडी काही न्यारीच असते. तिचा थंडगार गारवा घेतल्यानंतर आपल्याला गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आहोत असे वाटेल. थंडीमुळे आपल्याला थकवा जाणवत नाही. उलट आपली ऊर्जा वाढण्याला मदत होते. त्यात निसर्ग सौंदर्याने नटलेले कोकण पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. अशा निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे एक वेळ कडक वाटणारे ऊन थंडीमुळे हवेसे वाटते.
मी लहान असताना थंडीमध्ये नऊवारी साडीची शिवलेली गोधडी घ्यायचो. मोठी माणसे घोंगडी घ्यायचे. त्यामुळे थंडी आटोक्यात यायची. आता मात्र ब्लँकेट जरी घेतले, स्वेटर घातले तरी बालपणातील गोधडीची ऊब लय भारी होती. तेव्हा निसर्गरम्य वातावरणामध्ये थंडीचा गारवा घेतलाच पाहिजे. यासाठी येऊन बघा, आल्यानंतर पुन्हा यावेसे वाटेल. १९९९ साली देशातील पहिला पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. ही जिल्हावासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. तेव्हा ‘येवा कोकण आपलोच आसा’ असे कोकण पर्यटकांना साद घालत असले तरी खऱ्या थंडीच्या गारव्याचा आस्वाद घ्यायचा असेल, तर कोकणातच यायलाच हवे. आपण सर्वजण प्राथमिक शाळेमध्ये ऋतू शिकलो आहोत. आज वातावरणाचा विचार करता, ऋतूंचे उलटे चक्र फिरत असताना दिसत असले तरी खरी गुलाबी थंडी कशी असते, ते कोकणात आल्यावर समजेल. सध्या हळू हळू थंडीचा मोसम वाढत असून अधून-मधून ढगाळ वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे अजून खरी कोकणातील गुलाबी थंडी दूर आहे, असे म्हणावे लागेल.
मागील महिन्यामध्ये काही ठिकाणी वरुण राजाने हजेरी लावली. त्यामुळे थंडी पुढे वाढणार आहे, असा स्थानिक जनतेचा अंदाज असला तरी थंडीच्या मोसमात पावसाने हजेरी लावल्यामुळे कोकणातील फळ बागायदार चिंतेत आहे. आतापर्यंत अनेक संकटे कोकणी माणसाने सोसली आहेत; परंतु दु:खाचे ओझे पाठीवर घेऊन नेहमीच पुढे जात असतात. म्हणून आजही निसर्गरम्य कोकण टिकून आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोना व्हायरसच्या विषाणूंनी आक्रमण केलेले असले तरी आरोग्याच्या दृष्टीने पावसाळ्यात ‘माकड ताप’ वगळता जिल्ह्यात समाधानकारक आरोग्याची परिस्थिती आहे. मात्र, काही गंभीर आजारासाठी काही वेळा पणजी, कोल्हापूर किंवा मुंबई इत्यादी ठिकाणी जिल्ह्याबाहेर जावे लागते. ही वस्तुस्थिती असली तरी स्वच्छतेबाबत भारत सरकारने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव केला आहे. ही जिल्हावासीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.
कोकणातून रोजीरोटीसाठी जिल्ह्याबाहेर जे लोक गेले त्यांना गावची मंडळी चाकरमानी म्हणतात. गावात कितीही कडाक्याची थंडी पडली तरी आजही गोधडी किंवा कांबळे घेऊन थंडीपासून लोक बचाव करतात. मात्र त्यांना अधिक काळजी असते ती रोजीरोटीसाठी गाव-घर सोडून गेलेली जिवाभावाची माणसे अर्थात चाकरमानी गारठले असतील त्यांची. आजही त्यांचे सण चाकरमान्यांच्या जीवावर चालत असतात. असे असले तरी थंडीच्या दिवसात अंगाभोवती गोधडी गुंडाळून सकाळी कोवळ्या उन्हात सूर्याची सोनेरी किरणे अंगावर घेणे व रात्री झोपण्यापूर्वी शेकोटीचा धग घेतल्याने थंडीची मज्जा काही औरच असते. शेकोटीचा धग घेत घेत गाण्यांच्या भेंड्या लावणे. मोठ्याने टाळ्या वाजविणे जणू काय थंडी पळून गेली असा समज. याचाही आनंद वेगळा असायचा. सकाळी गावच्या नदीकाठी गेल्यास नदीच्या साठलेल्या पाण्यावर धुक्याची चादर तरंगत असताना दिसते.
जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आंबोली आहे. आंबोलीसारख्या ठिकाणी धुक्यामुळे एकमेकांचे दर्शनही होत नाही. हे चित्र सकाळचे पाहायला मिळते. याचाही आनंद काही वेगळाच असतो. तेव्हा प्रदूषणविरहीत स्वच्छ व निसर्गनिर्मित गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येवा.
-रवींद्र तांबे