कोरोना काळातली गोष्ट. मला थोडा सर्दी, ताप, खोकला. पहिले टेन्शन… कोरोना! तपासणी झाली. सुदैवाने निगेटिव्ह. त्या काळात ‘निगेटिव्ह आहे’ याच्यासारखी पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहे याच्यासारखी ‘निगेटिव्ह गोष्ट’ नव्हती.
हा थोडा सर्दी-ताप. चांगला ५-६ दिवस. ऑफिसचा ‘येऊ नका’ असा सज्जड दम, पडत्या फळाची आज्ञा. ताप आणि टीव्ही दोन्ही एन्जॉय करणं चाललेलं. पडू आजारी, मौज हीच वाटे खरी… असं काहीसं! तसंही आता पूर्वीसारखं आजारपणात किंवा सुट्टीतही आराम नसतो. या व्हॉट्सअॅपच्या जगात You are answerable.
तर… एका सकाळी अचानक ऑफिसच्या मित्राचा फोन. धडाधड ऑफिसच्या अडकलेल्या ‘टू डू’ची लिस्ट वाचायला सुरुवात. ३० मिनिटं प्रश्नोत्तरे झाल्यावरती फोन संपला आणि नंतर तब्येतीची, टेस्ट्स, तपासण्या, आता कसं वाटतंय. मी इतरांना तापवतो म्हणून मला ताप आला, असा जावईशोध लावून ‘यथासांग’ चौकशा सूचना देऊन, ये आता, पकलोय, जरा ‘बसूया’ असे सांगून फोन संपला.
त्याच संध्याकाळी दुसऱ्या डिपार्टमेंटच्या मित्राचा फोन. आधी सगळी चौकशी… काय, कसा, बरं आहे का? काय लक्षणे, कुठला डॉक्टर, आराम कर, हे ते खा? Quarantine हो. काळजीवजा चौकशा. इतर १० सूचना वगैरे वगैरे… नेहमी अजिबात संपर्कात नसणारा हा आज का एवढा फोन करतोय? माझ्या मेंदूचा एक कोपरा हे शोधण्यात गुंतलेला. अपेक्षित प्रश्न आला… अरे अमुक-तमुक पार्टीचा फोन नंबर आणि ईमेल आयडी आहे का रे? सांगितला आणि फोन संपला.
….म्हणलं तर फार विचार करण्यासारखी गोष्ट नाही… वरच्या दोन पैकी कोणी ‘चूक किंवा बरोबर’असं कोणीच नाही. तुम्ही कोणाच्या किती कमी-अधिक जवळ याच्यावरती संभाषणाची लांबी अवलंबून… अगदी मान्य! पण एकूणच etiquettes च्या नावाखाली ‘Trying to be good’ राहायचा प्रयत्न करणे किंवा ताकाला जाऊन भांडं लपवणे… दोन्ही सारखेच की!!
-डॉ. मिलिंद घारपुरे