Wednesday, March 19, 2025
Homeमहत्वाची बातमी‘...आणि प्रशांत दामले’ नाट्यक्षेत्रातील ‘सुनील गावस्कर’

‘…आणि प्रशांत दामले’ नाट्यक्षेत्रातील ‘सुनील गावस्कर’

रविवार ६ नोव्हेंबर रोजी प्रशांत दामले या रंगकर्मीच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’च्या एकूण नाटकांचा १२,५०० वा प्रयोग सादर होत आहे. त्यानिमित्त…

म्हणजे बघा हं, १०,००० धावा, प्रत्यक्ष खेळातून निवृत्त; परंतु तज्ज्ञ समालोचक म्हणून क्रिकेट क्षेत्रात आजही क्रिकेटप्रेमींना आपल्या वाणीतून देतोय क्रिकेट वृत्त आणि १२५०० प्रयोगांच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचून आजही नाट्यरसिकांना मनमुराद देतोय नाट्यानंद. या दोन्ही विक्रमवीरांच्या कारकिर्दीकडे पाहिल्यावर, दोघांमध्ये मला अनेक समानता दिसतात म्हणून हे शीर्षक.

तसं पाहिलं तर दोघांची क्षेत्र पूर्णपणे वेगळी. एकीकडे रणरणत्या उन्हात पाच दिवस रोज चालणारा साडेपाच तासांचा खेळ आणि भर उन्हात बसून तो पाहणारे क्रिकेट प्रेमी, तर दुसरीकडे थंडगार वातानुकूलित नाटयमंदिरात रंगणारा अडीच तीन तासांचा नाट्य प्रयोग, प्रयोगाला नटून सजून येणारे रसिक प्रेक्षक. पण नाटकातील कलाकार मात्र आधीचा कुठे दुसऱ्या टोकाला असलेल्या नाट्यमंदिरातील प्रयोग आटपून, आपलं जेवणखाण न पहाता, पुढच्या प्रयोगाला वेळेवर हजर. दोन्हीकडे वेळी अवेळी प्रवास, दौरे, दगदग सारखीच. एकीकडे क्रिकेट चाहत्यांनी तुडुंब भरलेलं स्टेडियम, तर दुसरीकडे House full झालेलं नाट्यमंदिर. एकीकडे भरपूर नेट प्रॅक्टिस, तर दुसरीकडे पुरेशा तालमी होणं हे गरजेचंच. आपल्या अप्रतिम खेळाने सामना रंगवणं आणि सुंदर अभिनयाने नाटक सावरणं, तसच एकीकडे नेत्रदीपक फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाला, तर दुसरीकडे अप्रतिम अभिनय, संवादाचं टायमिंग आणि नेपथ्याला जिवंत आणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. दोन्हीकडे संघभावनेला फार महत्त्व. जसा फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यातील समन्वय महत्त्वाचा तसेच लेखन दिग्दर्शन आणि सादरीकरण यामधला समन्वयही तितकाच महत्त्वाचा, तर अशा या नाट्यक्षेत्रात, जवळजवळ गेली पस्तीस वर्षे आपल्या उत्स्फूर्त अभिनयाने, संवादावरच्या हुकूमतीने आणि शिस्तबद्ध उत्साहाने, आजसाठी पार केलेला हा ग्रेट कलाकार, रंगमंचावर धुमाकूळ घालत आजही नाट्य रसिकांना प्रचंड आनंद देऊन मनमुराद हसवतोय. सुनील आणि प्रशांत दोघांनाही चिरतारुण्याचा वर आहे, हे त्यांना पाहिलं की तत्काळ जाणवतं.

प्रशांतची अभिनय कारकीर्द सुरू झाली साधारण १९८४-८५ मध्ये म्हणजे सुनील क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा साधारण दोन-तीन वर्षे आधी. सुनीलने सत्तरी पार केलीय आणि प्रशांतने साठी; परंतु आजही ज्या उत्साहात सुनील मुलाखतींमधून, जाहिरातींमधून आणि तज्ज्ञ समीक्षकाच्या भूमिकेतून भाष्य करत वर्षभर जगभराचे दौरे करत असतो, त्याचप्रमाणे अभिनयाबरोबरच, नाट्यनिर्मितीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत, सोबत मनातील सामाजिक भान कायम जपत, त्याचबरोबर व्यावसायिक दृष्टिकोन आत्मसात करत प्रशांत आपलं नाटक आणि सहकलाकार यांच्यासह देश-परदेशात अनेक दौरे यशस्वीपणे करत असतो. सुनीलने आपली कारकीर्द सुरू केली, एक रणजी खेळाडू यशस्वी सलामीवीर फलंदाज, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ते तज्ज्ञ समालोचक, तर प्रशांतने नाटकातील एक सहकलाकार-प्रमुख कलाकार ते निर्माता अभिनेता. दोघांनीही आपापल्या क्षेत्रातले सगळे फॉर्म हाताळले. सुनील रणजी सामने – कसोटी सामने – एकदिवसीय सामने खेळला, तर प्रशांत नाट्य, चित्रपट, टीव्ही मालिका, सूत्रसंचालन यामध्ये वावरला. सुनील कसोटी क्रिकेट या फॉर्ममध्ये जितका रमला, तितका एकदिवसीय सामन्यांमध्ये नाही रमला आणि टी-२० चे पीक तर तेव्हा आलेलंच नव्हतं. प्रशांतसुद्धा नाट्यक्षेत्रात तन-मनाने जितका रंगून गेला तेवढा चित्रपट, दूरदर्शन मालिका यात नाही रमला.

नाटक आणि कसोटी सामने अशा लंबी रेसच्या अबलख वारूसारखे हे दोघं आहेत. आडवी-तिडवी बॅट फिरवून धावा करणं आणि सीन कट करत अभिनय करणं, दोघांनाही फारसं रुचलं नाही, कारण कसोटी सामन्यातील फटक्यांमधली नजाकात, टायमिंग, क्षेत्ररक्षकांच्या मधून अचूक वाट काढत, जमिनीला समांतर जाणारे आणि डोळ्यांचं पारणं फेडणारे शॉट्स, तर दुसरीकडे नेमक्या टायमिंगसहित फेकलेल्या संवादावर हमखास मिळणारे हशे, संवादफेकीवरची हुकूमत आणि रंगमंचावरील सलग अभिनयाच्या आविष्काराचा रसिकांना मिळणारा आनंद ही या दोघांची बलस्थाने आहेत.

थोडं विषयाबाहेर येऊन आठवलेली एक गोष्ट सांगतो, संगीत नाटकांचा सुवर्णकाळ थोडा ओसरल्यानंतरची गोष्ट, बालगंधर्वांचे दैवी सूर चिरंतन राहावे आणि जास्तीत-जास्त रसिकांपर्यंत पोहोचावे हा मनी हेतू बाळगून चित्रपती व्ही. शांताराम यांनी बालगंधर्वांना घेऊन एक चित्रपट काढला; परंतु रंगमंचावरून आपल्या दैवी सुरांनी रसिकांना स्वरानंद देत राहणाऱ्या, रसिकांनी कितीही वन्स मोअर दिले तरी तितक्याच निष्ठेने पुन्हा पुन्हा नाट्यपद सादर करणाऱ्या बालगंधर्वांना चित्रपटातून कॅमेऱ्याचं भान सांभाळत तीन मिनिटात गाणं आटोपणं जमलं नाही. रसिकांच्या समोर येऊन आपल्या गायनाने त्यांना तृप्त करणं हेच त्यांचं ब्रीद होतं. असो, प्रशांतने अभिनयासोबतच गोड गळा जपला. गायन क्षेत्रात त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं असतं, तर एक उत्कृष्ट गायक आपल्याला मिळाला असता. प्रशांतने आपण एक उत्स्फूर्त आणि उत्कृष्ट सूत्रसंचालक असल्याचंही दूरदर्शन वाहिन्यांवरून सिद्ध केलंय.

तर सुनील खेळासोबत एक तज्ज्ञ समालोचक म्हणून पुढे आला, आपल्या मिश्कील शैलीने, स्पष्ट आणि निर्भिड बोलण्याने त्या काळात त्याने खेळाडूंना अनेक सुविधा मिळवून दिल्या. एक मात्र नक्की, या दोघांनीही आपल्या मुख्य कार्यक्षेत्राला, म्हणजे अभिनय आणि क्रिकेट जराही दुर्लक्षित केलं नाही, तर सर्वार्थाने पाहिलं प्राधान्य दिलं. सुनील धावांचे इमले रचत, संघाचा आधारस्तंभ बनत, जागतिक विक्रम करत, पुढे जात राहिला, तर प्रशांत नाट्यक्षेत्रात नवनवीन उच्चांक प्रस्थापित करत आजही पुढे जातोच आहे. दोघांनीही आपला फिटनेस जपलाय, हे अगदी आजही त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं.

सुनीलने अजित वाडेकर, सरदेसाई, सोलकर, विश्वनाथ, बेदी, प्रसन्ना, चंद्रा यांच्यासोबत आपली कारकीर्द सुरू केली. त्याच्याबरोबरचे काही खेळाडू निवृत्त झाले, कुणी व्याधीग्रस्त झाले, तर कुणी घरी बसले; परंतु सुनील मात्र कपिल, संदीप पाटील, मोहिंदर, शास्त्री अशा नव्या खेळाडूंसह त्याच जोमाने खेळत आणि एकेरी दुहेरी धावा घेत, चौकार-षटकारांची आतषबाजी करत खेळत राहिला, तर प्रशांतने, पुरुषोत्तम बेर्डे, वामन केंद्रे, दिलीप कोल्हटकर, विजय केंकरे, कुमार सोहनी, चंद्रकांत कुलकर्णी यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत, तर आजच्या पिढीतील अद्वैत दादरकर सोबतही काम केलं, तर प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण, अरुण नलावडे, सुकन्या कुलकर्णी, शाम पोंक्षे, सविता प्रभुणे, वर्षा उसगावकरपासून पुढे कविता मेढेकर तेजश्री प्रधान, अतुल तोडणकर या कलाकारांसोबत रंगमंच गाजवला आणि आचार्य अत्रे, वसंत सबनीस, रत्नाकर मतकरी, श्रीरंग गोडबोले, अभिराम भडकमकर, ते आजच्या पिढीतील लेखक-दिग्दर्शक-अभिनेता संकर्षण कऱ्हाडेपर्यंत लेखकांच्या नाटकांवर आपला नाट्यप्रवास यशस्वी केला, नव्हे आजही करतो आहे.

सुनील हा पहिला भारतीय क्रिकेट खेळाडू, ज्याने कसोटी सामन्यात दहा हजार धावांचा टप्पा पार केला, इतकंच नव्हे, तर डॉन ब्रॅडमनचा अनेक वर्षे अबाधित राहिलेला सर्वोच्च शतकांचा विक्रम मोडीत काढला. प्रशांत मात्र आजही थांबायला तयार नाही. त्याच्या टुरटुरपासून सुरू झालेल्या अभिनय प्रवासासह, नवनवीन नाट्यनिर्मितीतून एक निर्माता अभिनेता म्हणून आजच्या पिढीतील लेखक, दिग्दर्शक, कलाकारांसह पुढे जातो आहे. सुनीलच्या १०,००० धावांना आपल्या १२,५०० नाट्यप्रयोगांनी शह देत प्रशांतने एक पाऊल पुढे टाकलंय. सुनीलनेही त्याला योग्य वयात भारताच्या क्रिकेट संघात मिळालेला प्रवेश आपल्या खेळाने सार्थ ठरवला. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाट्यप्रयोगाने प्रशांतच्या एकूण नाटकांचा १२,५००वा प्रयोग षण्मुखानंद नाट्यमंदिरात साजरा होतोय. प्रशांत आणि सुनील दोघंही आपापल्या कार्यक्षेत्रात आजही दिमाखात उभे आहेत… नव्हे कार्यरत आहेत. म्हणून या लेखाचं शीर्षक दिलंय,

‘…आणि प्रशांत दामले’ नाट्यक्षेत्रातील ‘सुनील गावस्कर.’ १२,५००व्या प्रयोगाच्या निमित्ताने प्रशांत दामले या ग्रेट रंगकर्मीला खूप खूप शुभेच्छा, दीर्घायुरारोग्य चिंतून म्हणावंसं वाटतं,

टुरटुर पासुनी रंगभूमीवर
उभा आहे हा स्थिर,
नटवर्य हा नाट्यकलेचा
अभिनयातला वीर…

-प्रसाद कुळकर्णी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -