Sunday, June 22, 2025

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत, तर दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.


फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज दिलेल्या मुदतीत शाळा, महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर भरायची आहेत.


बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज करण्याची मुदत ५ नोव्हेंबरला, तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून भरायची मुदत १० नोव्हेंबरला संपत आहे. या मुदतीत वाढ करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. दहावीची परीक्षा देणाऱ्या पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Comments
Add Comment