पर्थ (वृत्तसंस्था) : गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीमुळे पाकिस्तानने दुबळ्या नेदरलँडवर सोपा विजय मिळवत टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आपल्या विजयाचे खाते उघडले. रविवारी झालेल्या या सामन्यात शादाब खान, मोहम्मद वसीम, नसीम शहा, हॅरीस रौफ, शाहिन शाह आफ्रिदी या गोलंदाजांना पाकच्या विजयाचे श्रेय जाते. विश्वचषकातील बलाढ्य संघ असूनही पाकिस्तानला आतापर्यंत विजय मिळवता आला नव्हता अखेर तिसऱ्या सामन्यात त्यांनी नेदरलँडला मात दिली आहे.
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड यांच्यात रविवारी ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे सुपर-१२ फेरीतील सामना खेळला गेला. ९२ धावा करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानने सहज लक्ष्य पूर्ण केले. पाकिस्तानने ६ गडी राखून नेदरलँडला मात दिली. आधी नेदरलँडला अवघ्या ९१ धावांत रोखत त्यानंतर १३.५ षटकांत ४ गडी गमावून हे लक्ष्य पार केले. मोहम्मद रिझवानने ४९ धावांची दमदार खेळी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. फखर जमानने २०, तर तर शान मसूदने १२ धावा केल्या. विशेष म्हणजे पाकिस्तानचा स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे. याआधी पाकिस्तानला भारताने ४ विकेट्सने, तर झिम्बाब्वेने अवघ्या एका धावेने पराभूत केले होते.
सामन्यात सर्वप्रथम नेदरलँडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने भेदक गोलंदाजी करत अवघ्या ९१ धावांवर नेदरलँडला रोखले. त्यांच्या अॅकरमॅनने २७ धावा केल्या. नेदरलँडकडून या सर्वाधिक धावा ठरल्या. कर्णधार एडवर्ड्सनेही १५ धावा केल्या असून इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरीच्या जोरावर हे यश संपादन केले. शादाब खान, मोहम्मद वसीम, नसीम शहा, हॅरीस रौफ, शाहिन शाह आफ्रिदी यांनी बळी मिळवण्यासह धावा रोखण्यावरही भर दिला. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीने नेदरलँडच्या फलंदाजीचा कणाच मोडला. त्यामुळे छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणे पाकला जड गेले नाही.
टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तानला पहिल्या विजयाची प्रतीक्षा होती. अखेर रविवारी दुबळ्या नेदरलँडला नमवत पाकिस्तानने आपल्या विजयाचे खाते उघडले.