रत्नागिरी (प्रतिनिधी) : रात्रीच्या वेळी रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर दिसणाऱ्या निळ्या लाटा प्रत्येकाच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत. गेले तीन दिवस रत्नागिरी नजीकच्या गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर या निळ्या लाटा पहायला मिळत आहेत. नॉकटील्युका हा एकपेशीय डायनोफ्लॅजेलेट गटात मोडणारा प्राणी प्लवंग आहे. डोळ्यांनी दिसू शकणारा हा सूक्ष्मजीव आपल्या शरीरातून काजव्यासारखा जैविक प्रकाश निर्माण करू शकतो. खळबळणाऱ्या, उसळणाऱ्या लाटांमुळे हे प्राणी उद्दीपित होतात आणि या निळसर प्रकाशाने चमकू लागतात. नॉकटील्युका सिंटीलांस या शास्त्रीय नावाने ओळखला जाणारा हा प्राणी सध्या समुद्रात दिसणाऱ्या निऑन लाईट्स सारख्या हिरव्या निळ्या प्रकाशाने चर्चेत आला आहे आणि समुद्राला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणचा विषय बनला आहे. सी स्पार्कल म्हणूनही तो ओळखला जातो. सध्या जगभर या प्राण्यावर संशोधन केले जात आहे ते त्याच्या थंडीमध्ये अचानक येणाऱ्या विंटर ब्लूम्समुळे.
उत्तर अरेबियन समुद्र ते अरेबियन पेनिन्सुला दरम्यान हे प्राणी मोठ्या प्रमाणात सध्या दिसत आहेत. एरवी दिवस लालसर रंगाने दिसणारा हा प्राणी सध्या हिरवट रंगाचा दिसून येत आहे आणि दिवसा पाण्यावर हिरवट शेवाळासारखा थर दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे या प्राण्याने आपल्या शरीरात पेडीमोनाज नॉकटील्युके या शैवाल वर्गीय सजीवांना आसरा दिला आहे. त्यामुळे तो हिरवट दिसतो आणि त्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करून अन्न ही प्राप्त करू शकतो. जलचरांची सूक्ष्म पिल्ले, अंडी यावर उपजीविका करणारा हा प्राणी, म्हणूनच अन्न उपलब्ध नसेल तरीही जगू शकतो. त्यात मोठ्या प्रमाणात साठणाऱ्या अमोनियामुळे जेलीफिश सोडल्यास इतर कोणी त्याला खात नाहीत.
किनाऱ्याकडे सूक्ष्म खाद्याची उपलब्धता आणि वातावरण असल्याने नॉकटील्युकाचे थवे किनारीकडे सरकतात. या ब्लूम्समुळे समुद्रातील डायटम्सच्या प्रमाणात मात्र लक्षणीय घाट झाली आहे. हे खूप चिंतेचे आहे कारण डायटम्स हे वनस्पती प्लवंग समुद्रातील प्राथमिक उत्पादक आहेत आणि समुद्रातील जैव साखळी ही या प्लवंगावर अवलंबून असते. पण अचानक या प्राण्याच्या संख्येत अशी प्रचंड वाढ का झाली असावी हा संशोधनाचा विषय आहे. यामध्ये दोन कारणांचा उल्लेख करावा लागेल. त्यात समुद्राच्या पाण्यात कमी झालेला ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साईडचे वाढलेले प्रमाण, हिमालयन तिबेटीयन पठारावरील ग्लेशियर्सचे कमी होत जाणारे प्रमाण आणि त्यामुळे तेथून येणाऱ्या थंड वाऱ्यांवर झालेला परिणाम ही कारणे प्रामुख्याने समोर येत आहेत. नॉकटील्युका हा कमी ऑक्सिजन असलेल्या वातावरणातही राहू शकतो.
त्याच्या शरीरातील शैवाल पेशी कार्बन डाय ऑक्साईडच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्मिती करू शकतात. दुसरे कारण हे अप्रत्यक्षरीत्या नॉकटील्युकाला मदत करते. ग्लेशियर्सवरून येणारे थंड वारे उत्तर अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे पाणी थंड करतात आणि हे थंड पाणी जड होऊन समुद्र तळाशी जाते. त्यामुळे तेथील काहीसे गरम आणि पोषक घटकांनी युक्त असे पाणी वर येत. ही अपवेलींगची क्रिया पाण्यातील पोषक आणि उपयुक्त घटक थरांमध्ये मिसळण्याची प्रक्रिया घडवून आणते. पण ग्लेशियर्स कमी होत असल्याने हे गार वारे आणि त्यामुळे होणारी ही अपवेलींगची प्रक्रिया यात घट होत आहे. ही परिस्थिती इतर प्लवंगांपेक्षा नॉकटील्युकाला फायदेशीर ठरते. इतर खाद्य नसतानाही हा प्राणी त्याच्या शरीरातील शेवाळाच्या पेशींच्या मदतीने वर्षभरही जगू शकतो. सध्या जगभरात, विशेषतः समशीतोष्ण कटिबंधातील समुद्रात ह्या ब्लूम्स आढळत आहेत. याचा संबंध समुद्रातील अन्न साखळीशी आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. म्हणूनच यावर संशोधन करण्याची गरज आहे. याच्या सुंदर निळसर प्रकाशात चमकणाऱ्या समुद्राच्या लाटा आपल्याला आकर्षित करतात पण या सौंदर्यामागील कारणांवर विचार करणे महत्त्वाचे ठरेल.