Tuesday, October 8, 2024
Homeक्रीडाआफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ

आफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ

सूर्यकुमारची खेळी व्यर्थ; मार्करम-मिलर जोडीचे यश

पर्थ (वृत्तसंस्था) : लुंगी एनगिडी, वायने पारनेल या गोलंदाजांच्या जोडगोळीने भारताच्या फलंदाजीची धार बोथट करत भारताला मोठे लक्ष्य गाठू दिले नाही. त्यानंतर आयडेन मारक्रम, डेविड मिलर यांची अर्धशतके दक्षिण आफ्रिकेच्या विजयात मोलाची ठरली. पराभवामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताचा विजयरथ रोखण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आले. दरम्यान छोटे लक्ष्य असले तरी भारताच्या गोलंदाजांनी स्वींगचा आणि टप्प्याचा अचूक वापर करत दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकापर्यंत रडवले. सामना गमावल्यामुळे सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकासह अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी यांची गोलंदाजीतील दमदार कामगिरी व्यर्थ गेली आहे.

भारताने दिलेल्या १३४ धावांच्या माफल लक्ष्याचा पाठलाग करतान दक्षिण आफ्रिकेची चांगलीच दमछाक झाली. अर्शदीप सिंगने वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या दुसऱ्या षटकातील क्विंटॉन डि कॉक आणि रिली रॉसूव यांना बाद करत आफ्रिकेला अडचणीत टाकले. त्यानंतर शमीने टेम्बा बवुमाचा अडथळा दूर केला. २४ धावांवर त्यांचे ३ फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर आयडेन मारक्रम आणि डेविड मिलर यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. या दरम्यान भारताने ही जोडी फोडण्याच्या तीन संधी सोडल्या. विराटने मारक्रमचा हातातला झेल सोडला, तर दुसऱ्यांदा दुमत झाले. एक धावचित करण्याची संधीही भारताने गमावली. मारक्रमने ५२ धावांचे योगदान दिले. मिलरने नाबाद ५९ धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने १९.४ षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात विजयी लक्ष्य गाठले. भारताच्या अर्शदीप सिंगने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत २५ धावा देत २ बळी मिळवले. मोहम्मद शमीने ४ षटकांत १३ धावा देत १ बळी मिळवला. हार्दीक पंड्या, रविचंद्रन अश्वीन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत २० षटकांत ९ बाद १३३ धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एन्गिडीच्या भेदक माऱ्यासमोर भारताची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज देत ४० चेंडूंत ६८ धावांची खेळी करत भारताला शतकी मजल मारून दिली. भारताचे अन्य फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. रोहितने १५, तर विराटने १२ धावा केल्या. आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने ४, तर वेन पार्नेलने ३ बळी मिळवले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -