मुंबई (वार्ताहर) : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवार ३० ऑक्टोबर २०२२ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला- वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे – माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर
कधी – सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील. ठाण्याच्या पलीकडे या जलद गाड्या पुनश्च डाउन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तर ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील. त्यापुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर वळविल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
हार्बर रेल्वे
कुठे – कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर
कधी – सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशी करिता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल- वाशी या भागांत विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकावरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.
पश्चिम रेल्वे
कुठे – गोरेगाव ते सांताक्रूझ दरम्यान अप धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर
कधी – रात्री १२.२५ ते पहाटे ४.२५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान डाउन दिशेच्या सर्व जलद गाड्या गोरेगाव ते सांताक्रूझ दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर धावणार आहेत. तर, अप धीम्या मार्गावरील सर्व लोकल सेवा गोरेगाव ते सांताक्रूझ दरम्यान अप जलद मार्गावर धावणार आहेत. सर्व धीम्या उपनगरीय सेवांना विलेपार्ले स्थानकावर दुहेरी थांबा दिला जाणार आहे. जलद मार्गावर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे उपनगरीय गाड्या राम मंदिर स्थानकावर कोणत्याही दिशेने थांबणार नाहीत.