नाशिक (प्रतिनिधी) : दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून मनमानी दराचे आकारणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर या सर्व विषयाकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने कोणतीही कारवाई होत नसल्याचे समजते.
दिवाळी सणानिमित्त असलेल्या सुट्ट्या लक्षात घेऊन बाहेरगावी आपल्या घरी जाणाऱ्या नागरिकांना खासगी ट्रॅव्हल्सच्या वाढत्या दरवाढीचा सामना करावा लागत असून प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. कोरोना महामारीनंतर मोठ्या प्रमाणावर कोणतेही निर्बंध नसल्याने दिवाळी सण साजरा होत आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यातच अगदी पंधरा दिवसांपूर्वी मनमानी वागण्यामुळे नाशिकमध्ये एका खासगी ट्रॅव्हल्सच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यापासून कोणताही बोध न घेता खासगी ट्रॅव्हल चालकांकडून मनमानी पद्धतीने भाडेवाढ करण्यात आली आहे.
एरवी मुंबईसाठी ४०० ते ५०० रुपये तिकीटासाठी मोजावे लागणाऱ्या नाशिककरांना आता ८०० ते १,००० रुपये मोजावे लागत आहेत. पुण्याचा प्रवासही महागला असून, एरवी सिझन नसताना ५०० ते ६०० रुपये तिकीटदर खासगी कंपन्या आकारतात. दिवाळीचे कारण पुढे करत हेच दर १,२०० ते १,४०० रुपयांवर करण्यात आले. नाशिकमधून नागपूर, कोल्हापूर, औरंगाबादसह धुळे, जळगाव तसेच राज्याच्या बाहेर जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल करून दोन हजार रुपयांपेक्षा अधिक दराची तिकीटे घ्यावे लागत आहेत. तर धुळ्यासाठी हजार रुपये आणि जळगाव साठी दोन हजार रुपये अशी किंमत मोजावी लागत आहे. या सर्व दरवाढीकडे प्रादेशिक पर्यावरण विभाग म्हणजे आरटीओ आणि पोलिसांचे दुर्लक्ष असून ही दरवाढ नागरिकांना नाक दाबून सहन करावी लागत आहे.