Thursday, April 24, 2025
Homeकोकणरायगडऐन दिवाळीत शेतकऱ्यांना भात कापणीची चिंता

ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना भात कापणीची चिंता

अलिबाग, मुरुड, रोह्यात कापणीची घाई

अलिबाग (प्रतिनिधी) : जिल्ह्यात परतीचा पावसाचा जोर काही तालुक्यात कायम असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. दररोज सायंकाळी विजांसह पाऊस पडत असल्याने कापलेले भातपीकही धोक्यात आले आहे. दरवर्षी गणेशोत्सवानंतर बळीराजाला शेत कापणीचे वेध लागतात. मात्र यंदा दिवाळी आली तरी पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पाऊस हिरावून नेतो की काय, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.

भातकापणीस आणखी उशीर झाल्यास भाजीपाला लागवडीचा ताळेबंद बिघडेल, या हिशोबाने अलिबाग, मुरूड, रोहा तालुक्यातील शेतकरी भात कापणीची घाई करू लागले आहेत; तर डोंगराळ भागातील हलव्या वाणाची पिकेही तयार झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस थांबण्याची वाट न पाहता भातकापणीस सुरुवात केली आहे. कापलेला भात चांगला सुकावा म्हणून दररोज परतवून ठेवावा लागतो. त्यानंतर भारे बांधून उडवी रचून तो सुरक्षितपणे ठेवण्यात येत आहे. अशा मेहनतीवर परतीचा पाऊस पाणी फिरवत असल्याने उभी पिके जमिनीवर आडवी झाली आहेत.

मळ्यात, खाचरात पाणी साचून आडव्या पिकांच्या लोंबीवरच नव्याने कोंब येण्याची भीती शेतकऱ्याला सतावत आहे. पावसात भात पडून राहिल्यामुळे दाण्यांचीही गळ सुरू झाली आहे. काही ठिकाणी जास्त काळ तयार भात पावसात राहिल्यामुळे तांदूळ काळे पडण्याची भीती शेतकरी वर्गाला आहे. पावसाचा सर्वाधिक फटका मुरूड, श्रीवर्धन, तळा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे; परंतु तरीही कृषी विभागाकडून नुकसान झाले नसल्याचे सांगितले जात आहे. परतीच्या पावसाचे सावट लक्षात घेऊन भातकापणीकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांची दिवाळी भात कापणीच्या चिंतेत जात आहे.

सध्या हलव्या वाणाच्या पिकाची कापणी सुरू आहे. एकूण ९६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी साधारण सहा हजार हेक्टर क्षेत्रातील भात पिकाची कापणी झाली आहे. गरव्या आणि निमगरव्या वाणाची कापणी काही दिवसांतच सुरू होईल, यासाठी शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच कापणीला सुरुवात करणे, योग्य ठरेल. दिवसभर कापलेला भाताची सायंकाळी लगेच मळणी करता येईल का, याचे नियोजन करावे. यातून शेतकऱ्यांचा खर्च, नुकसानीची शक्यता टाळता येईल.
– दत्तात्रेय काळभोर, कृषी उपसंचालक, रायगड

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -