नाशिक (प्रतिनिधी) : भारतीय वायुसेनेच्या जवानाने रात्रपाळीत कामावर असताना सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या जवानाने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
वीरेंद्र कुमार (वय २८, नेमणूक एअरफोर्स स्टेशन, देवळाली कॅम्प) असे स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नाव आहे. देवळाली कॅम्प छावणीचा परिसर हा लष्करी आस्थापनेचा परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात कार्यरत असलेल्या दक्षिण वायुसेना स्टेशनमध्ये जवान वीरेंद्र याने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्याला त्याच्या सहकाऱ्यांनी एअरफोर्स येथील मेडिकेअर सेंटर येथे दाखल केले असता डॉ. नवनीत यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेने एअरफोर्स स्टेशन परिसर हादरून गेला आहे. जवान विरेंद्र कुमार हे एअर फोर्स कर्मचारी वसाहतीच्या क्वार्टरमध्ये वास्तव्यास होते. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक भोईर तसेच लष्कर विभागाकडून केला जात आहे.