कासा (प्रतिनिधी) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नामांकित योजनेद्वारे डहाणू व जव्हार आदिवासी प्रकल्प भागातील अनेक तालुक्यांमधून आदिवासी विद्यार्थी इंग्रजी शिक्षणासाठी नामांकित शाळेत जात असतात. मात्र निवासी शाळा चालकांचे येथील आदिवासी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशा तक्रारी डहाणू आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत.
मागील दोन महिन्यांपूर्वी बहुतेक मुले शिक्षणासाठी कर्जत, महाबळेश्वर, पुणे येथे नामांकित शाळेत गेली होती. आता दिवाळीची सुट्टी पडल्याने ते आपापल्या घरी परतली आहेत. या मुलांना घेण्यासाठी कासा येथील भिसे विद्यालयाच्या मैदानात पुन्हा विद्यार्थ्यांना आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी अनेक पालक जमा झाले होते.
यात डहाणू तालुक्यातील तवा येथील पालक कमलाकर पाचलकर यांची पांचगणी येथील ब्लूमिंगडेल स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात सातवीत शिकणारी मुलगी त्यापैकी एक आहे. ती गेल्या दीड महिन्यापासून आजारी होती. याबाबत तिने पालकांना सांगितल्यावर पालकांनी शाळा चालकांशी संपर्क साधून तिच्यावर औषधोपचार करण्यास सांगितले होते. तेव्हा शाळेकडून योग्य ती काळजी घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. पण त्या विद्यार्थिनीची योग्य ती काळजी घेतली नाही. ती घरी आली तेव्हा खूप अशक्त असल्याचे आढळले. तसेच यामुळे पुन्हा ती तेथील निवासी शाळेत जाण्यास तयार नाही. त्यामुळे आम्ही तिला येथील जवळच्या निवासी शाळेत प्रवेश मिळावा यासाठी प्रकल्प कार्यालयात अर्ज दिला आहे, असे कमलाकर यांनी सांगितले.
आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येथील आदिवासी विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी पुणे, पाचगणी, महाबळेश्वर येथे जात असतात; पण अनेक मुलांची तेथे योग्य ती काळजी घेतली जात नाही. त्यामुळे प्रकल्प कार्यालयात आम्ही माझ्या मुलीला येथेच जवळच्या निवासी शाळेत शिक्षणाची सोय करावी, असे पत्र दिले आहे. – कमलाकर पाचलकर, पालक, तवा