दापोली (प्रतिनिधी) : दापोली नगरपंचायतीच्या वतीने बालोद्यानात कोंडलेल्या गुरांच्या खाण्या-पाण्याची व्यवस्था केली आहे. दापोली नगरपंचायतीने शहरातील नियोजित बालोद्यानात मोकाट जनावरांना कोंडून ठेवल्याने यातील एका बैलाचा मृत्यू झाला होता. या जनावरांना खाण्या-पाण्याची व्यवस्था नसल्याने नगर पंचायतीच्या वतीने या गुरांच्या खाण्याची व पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली. याबद्दल दापोलीतील नागरिकांनी आभार मानले आहेत.
शहरात गेल्या आठवड्यात जनावरांना बेशुद्ध करून गुरे पळवणाऱ्या टोळीचा जागरुक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पर्दाफाश केला होता. यातील जनावरे पोलिसांनी नगरपंचायतीच्या ताब्यात दिल्यावर ही सर्व जनावरे स्टेट बँकेसमोर नियोजित बालोद्यानात ठेवली होती. मात्र या जनावरांना खाणे व पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात न आल्याने त्यातील एका बैलाचा मृत्यू ओढवल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नगर पंचायतीने या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. यासाठी प्लास्टीकचे मोठे बकेट येथे ठेवण्यात आले. मात्र या जनावरांच्या खाण्याची जी व्यवस्था केली, ती निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप होत आहे.
यातील एका बैलाचा दुदैवी मृत्यू ओढावला होता यासंदर्भात नगर पंचायतीचे आरोग्य विभागाचे संदीप जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की हा बैल कोणत्या कारणाने दगावला, याबाबत अद्याप तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यावर हा बैल कोणत्या कारणाने मृत पावला ते स्पष्ट होणार आहे.