बोर्डी : पाऊस उसंत घेत नसल्यामुळे कुंभारकाम करणाऱ्या कारागिरांना याचा मोठा फटका बसला आहे. मातीची भांडी सुकवण्यासाठी सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे मडकी, दिवे, इतर मातीची भांडी तयार करण्याचे काम मंद गतीने सुरू आहे.
त्यामुळे गुजरात, राजस्थानमधून विक्रीसाठी आलेल्या दिवे व इतर भांड्यांना सुगीचे दिवस आले आहेत. विजयादशमीनंतर जवळजवळ पाऊस काढता पाय घेतो. त्यानंतर शेतातील माती आणून त्याच्यावर प्रक्रिया करून मातीचे दिवे, मडकी इत्यादी भांडी बनवण्याचा कामाला सुरुवात केली जाते. ही सर्व भांडी दिवाळीच्या काळात विक्रीसाठी आणली जातात.
मात्र चालू वर्षी दिवाळी तोंडावर आली असतानाही पाऊस सुरूच असल्याने स्थानिक पातळीवरील कुंभारकामात शिथिलता आली आहे. त्यामुळे राजस्थानमधून आलेल्या मडकी व दिव्यांच्या विक्रीला सुगीचे दिवस आले आहेत.