नुकत्याच पार पडलेल्या ३६व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी १४० पदके जिंकत सर्वसाधारण उपविजेतेपद पटकाविले. महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक कामगिरीमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंची संख्या मोठी आहे. त्यात काही खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत पदक मिळविण्यापर्यंतची कामगिरी केली आहे. असे मातीतील मोती, त्यांची स्वप्नं, त्यांची धडपड त्यांच्याकडूनच जाणून घेत, ‘दैनिक प्रहार’ने टाकलेला हा प्रकाशझोत.
ज्योत्स्ना कोट-बाबडे
मुंबई (वार्ताहर) : खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत स्पर्धेत निर्भेळ यश संपादन केले. महाराष्ट्राच्या या सुवर्णपदक विजयाच्या प्रवासात सिंहाचा वाटा होता तो, सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर या छोट्याशा गावातील रामजी कश्यप या तरुणाचा. घरची परिस्थिती बेताचीच, पण तरीही मागे न हटता रामजीने आपला खो-खो प्रवास सुरूच ठेवला. पुठ्ठे वेचक ते सुवर्णपदक विजेत्या संघातील खेळाडू असा खडतर, पण थक्क करणारा रामजी कश्यपचा प्रवास आहे. वेळापूर या छोट्याशा गावातून खो-खोमध्ये पुढे येत परिस्थितीला ‘खो’ देण्याचा प्रयत्न रामजी कश्यप हा पठ्ठ्या आजही करत आहे. गावातल्या मातीतला निरागसपणा, साधेपणा आणि ओलावा त्याच्या बोलण्यातून पदोपदी जाणवतो. महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले, आता रेल्वेच्या संघाचे प्रतिनिधित्व करायचे आहे, अशी भावना रामजी कश्यपने व्यक्त केली.
आजही पुठ्ठे गोळा करतो!
पुठ्ठे गोळा करून त्याची विक्री करणे हाच एकमेव आर्थिक स्त्रोत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतरही रामजी कश्यपचा संघर्ष थांबलेला नाही. आजही तो पुठ्ठे गोळा करून घरच्यांना मदत करतो. खेळातून मिळालेल्या पुरस्काराची रक्कम घरात कमी आणि त्याच्या डायएटवरच जास्त खर्च होते,
असे रामजी सांगतो.
इतर मुलांना खेळताना पाहून खो-खोकडे आकर्षित झालो!
मराठी शाळेत असताना लहानपणी मुलांना खोखो खेळताना पाहून या खेळाकडे आकर्षित झालो. त्यानंतर पाचवीत इंग्लिश शाळेत गेलो. तेथे असताना नारायण जाधव सरांनी माझ्यातील खोखो खेळण्याचे कौशल्य ओळखून खेळायला शिकवले आणि माझ्यातील खेळाला एक दिशा दिली”, असे रामजी आवर्जून सांगतो.
आधी घरचे खेळायला सोडायचे नाहीत!
सकाळी पाच वाजल्यापासून माझा दिवस सुरू होतो. सकाळी आठ वाजेपर्यंत खो-खोचा सराव करतो. पुन्हा संध्याकाळी पाच ते साडेआठपर्यंत सोमनाथ सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो, असे रामजी म्हणाला. सुरुवातीला आई-वडिलांचा पाठिंबा नव्हता. घरचे खेळायला सोडायचे नाहीत. “आमच्याच पोराला कशाला घेऊन जाता” असे बोलायचे; परंतु प्रशिक्षकांनी घरी येऊन त्यांचे मन वळवले. कधी कधी तर घरात न सांगताच पळून जाऊन सराव केल्याचेही तो सांगतो. या सर्वात मोठा भाऊ रामनारायण आणि बहीण अंजली कश्यप यांनी त्याला खेळासाठी पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळे व नारायण जाधव सर तसेच सोमनाथ बनसोडे सरांनी घेतलेल्या मेहनतीमुळे मी आज इथवर पोहोचलो आहे. आता कुठेही खेळायला जाण्याची परवानगी घरातून सहज मिळते, असे रामजी सांगतो.
पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धेत सीनिअर लेव्हलला खेळलो!
नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मी पहिल्यांदाच सीनिअर लेव्हलला खेळलो. या लेव्हलचा अनुभव नसल्याने मनात धास्ती होती; परंतु इतर सीनिअर खेळाडूंनी सांभाळून घेत प्रोत्साहित केल्याचे रामजी सांगतो. आतापर्यंत ज्युनिअर लेव्हलला ७ राष्ट्रीय स्पर्धा खेळत ६ सुवर्ण आणि एक रौप्य मिळवत त्याने त्या गाजवल्या आहेत. आता रेल्वेकडून खेळण्याचे स्वप्न असून एक दिवस देशाचे प्रतिनिधित्व करायचे असल्याचे रामजी सांगतो. पदार्पणातच रामजी कश्यप याने नवखा असूनही महाराष्ट्र खो-खो संघाला आपल्या कौशल्याने सुवर्ण मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या आधी “खेलो इंडिया” स्पर्धेतही कर्णधार रामजीने महाराष्ट्र संघाला सुवर्णयश मिळवून देण्यात महत्त्वाची
भूमिका बजावली होती.
संघासाठी खेळतो!
माझा लहान भाऊ अजय कश्यप १४ वर्षांखालील राष्ट्रीय खो-खो स्पर्धा खेळला असून त्याला पुरस्कार मिळाला असल्याचे रामजी स्वतःहून अभिमानाने आणि आवर्जून सांगतो. यावर तुला कोणता पुरस्कार मिळाला आहे का? असे विचारले असता, “मला काय पुरस्कार नाय मिळालं” असे मिश्कीलपणे सांगतो. त्यातील त्याची ग्रामीण भाषेतील निरागसता अगदीच मनाला भावते. शिवाय आपण पुरस्कारासाठी नाही, तर आपल्या संघासाठी खेळतो आणि आपल्या खेळाने आपल्या संघाला जिंकून द्यायला जास्त आवडते, असे रामजी सांगतो. अभ्यासापेक्षा खेळात जास्त रस असल्याचे हसत हसत कबुल करतो. “एकदा २०१६-१७ साली नाशिकच्या एका स्पर्धेसाठी जाताना पैशांची अडचण होती, तेव्हा सोमनाथ सरांनी नवीन बूट तसेच इतर प्रवास खर्चासाठी मदत करून स्पर्धेसाठी जाण्याचा मार्ग मोकळा केला”, असे रामजी कृतज्ञतापूर्वक सांगतो.