मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने १० ऑक्टोबरपासून दुकानांवरील मराठी पाट्यांकरिता तपासणी सुरू केली आहे. मंगळवारपर्यंत ७९.२८ टक्के दुकाने आणि आस्थापनांवर कायद्यानुसार मराठी पाट्या आढळल्या आहेत, तर २०.७२ टक्के दुकानांनी अद्यापही मराठी पाट्या लावल्या नसल्याचे समोर आले आहे. २६७२ दुकाने आणि आस्थापनांना नोटीस देण्यात आल्या आहेत.
मुंबईतील दुकाने, आस्थापने, हॉटेलांवरील पाट्या मराठीत असल्या पाहिजेत असा नियम आहे. याबाबत मुंबई पालिकेने तपासणी सुरू केली आहे. १० ऑक्टोबरपासून पालिकेच्या आस्थापन विभागाकडून मराठी पाट्यांकरिता तपासणी सुरू केली आहे. यात १० ते १७ या ऑक्टोबरच्या कालावधीत १२,००१ दुकानांची पाहणी केली आहे. यावेळी ९३२९ दुकानांवर मराठी पाट्या दिसल्या, तर २६७२ दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या नसल्याचे समोर आले आहे. ज्या दुकानांवर मराठी पाट्या नाही अशा २६७२ दुकानांना पालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसीत ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
एकीकडे पालिकेच्या कारवाईवर स्थगिती आणण्यासाठी व्यापारी संघटना सर्वोच न्यायालयात गेली आहे, तर दुसरीकडे पालिकेने मराठी पाट्या नसलेल्या दुकाने, आस्थापनांवर कारवाई सुरू केली आहे. यात तपासणी सुरू झाली असून तपासणीत मराठी पाट्या दिसल्या नाहीत, तर पालिकेकडून नोटीस दिली जाते. या नोटीसमध्ये ७ दिवसांची मुदत देण्यात येते. मात्र ७ दिवसांनंतरही मराठी पाट्या दिसल्या नाही, तर पालिका कायद्याप्रमाणे कारवाई करणार असल्याचे समजते.